

जामखेड (नगर), पुढारी वृतसेवा: जामखेड तालुका मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जामखेडची बाजारपेठही कायम गजबजलेली असते. जामखेडलगत असलेला आष्टी, पाटोदा, करमाळा, भूम आदी तालुक्यांतील ग्राहकांचा कपडे, सोनेखरेदीसाठी कायम ओढा असतो. गेल्या दोन दिवसांत गुलाबी नोटांची चलती आणि त्यामुळे गुलाबी माहोल बाजारात निर्माण झाला आहे. त्याचा त्रास मात्र व्यापार्यांना होताना दिसत आहे.
रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जवळपास गायब झालेल्या या गुलाबी नोटा बाजारात दिसू लागल्या आहेत. दोन दिवसांत बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. मात्र, पेट्रोलपंप, सोने-चांदी, कापड यांसह लहान-मोठी खरेदी करण्यासाठी लोक दोन हजार रुपयांच्या नोटा देत गुलाबी भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
दोन दिवसांत काही बँक खात्यांमध्ये दोन हजारांच्या नोटा जमा करण्यात आल्या; परंतु त्याचे प्रमाण फार अधिक असल्याचे बँक अधिकार्यांनी सांगितले. दुसरीकडे बाजारात तीन दिवसांत छोट्या-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात असल्याने डोकेदुखी वाढल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
पूर्वी दिवसभरातून एखादी गुलाबी नोट दिसायची, शहरात झेरॉक्स व ऑनलाईनचा व्यवसाय करणारे भरत बांगर यांनी सांगितले, की गेल्या दोन तीन दिवसांत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण वाढले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी, तसेच बँकेत जमा करण्यासाठी चार महिने मुदत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. फक्त या ग्राहकांना कमीत कमी त्रास व्हावा याकडे बँक व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत सहकारमित्र सचिन आटकरे यांनी व्यक्त केले.