पारनेर : कर्जुले हर्यात शंकराचे 200 फूटाचे शिल्प

पारनेर : कर्जुले हर्यात शंकराचे 200 फूटाचे शिल्प

Published on

पारनेर / टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या गावात भगवान शंकराचे 200 फूट उंचीचे शिल्प साकारण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे साडेचार कोटींच्या लोकवर्गणीतून स्वयंभूस्थान हरेश्वराचे शिवमंदिर व गार्डन उभे करणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन शिर्के, सचिव शिवाजी शिर्के व सरपंच संजिवनी आंधळे आदींनी दिली. या हरेश्वर मंदिरामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे.

राजस्थानातील मकराना या दगडाचा वापर करून हरेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून, मंदिरासमोर आता जिल्हात सर्वात उंचीचे 200 फूट भगवान शंकराचे शिल्प उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. भगवान शंकराचे हरेश्वर मंदिर नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील कर्जुले हरेश्वर येथे नदी किनारी आहे. मंदिराचा परिसर देखणा आणि निसर्गरम्य आहे. कौलारू बांधकाम असणारे जुने मंदिर आणि त्याचे सभागृह कालबाह्य झाल्याने गावकर्‍यांनी नवीन मंदिर आणि सभागृह उभारण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार गावकर्‍यांसह मुंबईकर व्यावसायीक, नोकरदारांनी सर्वसहमती दर्शवली आणि मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले.

राजस्थानातील मकराना येथील दगड या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि त्याचे नक्षीदार काम करत मंदिराचे काम पूर्णत्वास येत आहे. गावकरी आणि देणगीदारांच्या मदतीने सहा वर्षे मंदिर जिर्णोद्धाराचे काम चालू होते. मंदिरासमोर भव्य गार्डन उभारण्यात आली असून, त्यासाठी आमदार अरुण जगताप यांनी निधी दिला. याशिवाय गार्डनमध्ये वृद्धांना सकाळ-संध्याकाळ व्यायाम आणि चालण्यासाठी तीनशे मीटरचा जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात आला आहे. याशिवाय विरंगुळा म्हणून विविध 40 सिमेंट बाकडे ठेवण्यात आले आहेत. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अल्प दरात मंगल कार्यालय सुविधा देण्यात आली आहे.

कार्यालय विविध कार्यक्रमांना वापरले जाते. यामुळे गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना अत्यंत माफक दरात या कार्यालयाचा लाभ घेता आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोलाची मदत केली आहे. लोकवर्गणीतून जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चनू मंदिर आणि सभामंडप उभारण्यात येत असून, याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिरा समोरील नदीच्या पात्रात दोनशे फूट उंचीची भगवान शंकराची ध्यान मूर्ती उभारण्याचा संकल्प गावकर्‍यांनी केला असून, त्यासाठी गावाबाहेरील काही देणगीदारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सोमवार, मंगळवार हरेश्वर यात्रोत्सव
हरेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. वै. तुकाराम महाराज शास्त्री व स्व. विष्णू शिंदे यांनी गावासह मंदिर परिसरासाठी भरीव योगदान दिले. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. 3 व 4 एप्रिल रोजी यात्रोत्सवाचे आयोजन केले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन गावकर्‍यांनी केले.

logo
Pudhari News
pudhari.news