नगर : ‘नागेबाबा’च्या 36 खात्यांत अडीच किलो बनावट सोने, फसवणुकीचा आकडा पोहचला 76 लाखांवर

नगर : ‘नागेबाबा’च्या 36 खात्यांत अडीच किलो बनावट सोने, फसवणुकीचा आकडा पोहचला 76 लाखांवर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील नामांकित असलेल्या श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेची बनावट सोनेतारणाखाली आतापर्यंत 76 लाखांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तपासणीत सुमारे अडीच किलो (2441 ग्रम) बनावट सोने आढळून आले असून, पतसंस्थेच्या कर्जखात्यांची तपासणी सुरूच असल्याने फसवणुकिचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारणाची तपासणी सुरू असतानाच, संत नागेबाबा पतसंस्थेतील बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेची सुरूवातीला एकूण अकरा खाती तपासण्यात आली होती. त्यामध्ये 840 ग्रॅम बनावट सोने आढळून आले.

त्यावर 28 लाख 64 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. तसेच इतर अकरा आरोपींची एकूण 25 कर्जखाती तपासली असता त्यामध्ये सुमारे एक हजार 600 ग्रॅम वजनाचे (सुमारे दीड किलो) बनावट सोने आढळून आले आहे. त्यावर 47 लाख 79 हजार रकमेचे कर्ज घेण्यात आले. त्यामुळे आरोपींनी पतसंस्थेची 36 कर्जखात्यांत सुमारे 2441 गॅ्रम बनावट सोने ठेवून 76 लाखांनी फसवणूक केल्याची तपासात समोर आले आहे.

दरम्यान, गोल्ड व्हॅल्युअर अजय कपालेसह त्याचे साथीदार सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम या चौघांना नागेबाबाच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या पानपाटीलला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच कपाले, अळकुटे व कदम या तिघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दि.26 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यागुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

संत नागेबाबा पतसंस्थेच्या 36 खात्यांत 2441 ग्रॅम बनावट सोने आढळून आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
                                               -गजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक, कोतवाली

आतापर्यंत 16 आरोपी निष्पन्न
नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट पतसंस्थेत बनावट सोनेतारण ठेवून कर्ज घेतल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बनावट सोनेतारण असलेल्या कर्जखात्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news