शिर्डीत काकड, शेजारती भोंग्याविना | पुढारी

शिर्डीत काकड, शेजारती भोंग्याविना

शिर्डी ; पुढारी वृत्तसेवा : धार्मिक प्रार्थनास्थळावरील भोंग्यांवरून सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेले असताना शिर्डीच्या साई मंदिराने नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे साईबाबा संस्थानने तंतोतंत पालन करीत पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती विनाभोंगा करण्यात आली. दिवसाची माध्यान्ह आरती व धूपारती भोंग्यावर झाली; मात्र डेसिबल मर्यादेनुसार त्याचा आवाजही कमी केला गेला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य शासनाला प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरविण्यासाठी बुधवारपर्यंतचा अवधी दिलेला होता; अन्यथा मनसे स्टाईलने हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा पोलिस दल अर्लट झाले.

अहमदनगर पोलिस प्रशासनाने साईबाबा संस्थानला सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पत्र पाठवत त्याचे पालन करण्याची विनंती केल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. त्यानुसार साईबाबा संस्थानने त्या आदेशाचे तंतोतंत पालन करत रात्रीची शेजारती व पहाटेची काकड आरती विनाभोंगा म्हणायला सुरुवात केली आहे.

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान येणार्‍या माध्यान्ह आरती व धूपारती या 55 डेसिबल प्रमाणापेक्षा कमी आवाजात भोंग्यावर म्हणण्यात येणार आहेत. यासाठी साईबाबा संस्थानने कुठेही प्रथा, परंपरेला मुरड न घालता भोंगा आदेशाचे पालन केले.

सहा मशिदींत पहाटेची अजान विनाभोंगा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत शिर्डीच्या सहा मशिदींतील पहाटेची अजान विनाभोंगा करण्यात आली. तसेच दिवसभरात होणार्‍या चार अजानदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे कमी आवाजात सुरू केल्या आहेत. त्यासाठी संबंधित विभागाच्या रीतसर परवानग्या घेण्यात आल्या असल्याची माहिती जामा मस्जिद ट्रस्टचे बाबाभाई सय्यद यांनी दिली. शिर्डीतील सामाजिक ऐक्य हे बाबांच्या हयातीपासून असल्याने आजही ते शिर्डीत जपले गेल्याचे ते म्हणाले.

साईबाबांच्या आरत्या भोंग्यावर सुरू करा

श्री साईबाबा संस्थानने साईबाबांच्या काकड आरती व शेजारती या विनाभोंगा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिर्डीतील मुस्लिम समाजाने हा निर्णय साई संस्थानने मागे घेऊन काकड आरती व शेजारती पूर्ववत करण्याची मागणी शिर्डी पोलिसांकडे केली आहे. या आशयाचे निवेदन शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे. शिर्डीच्या इतिहासात प्रथमच आरती ही विनाभोंग्याची झाली . साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याला भोंगावादाने गालबोट लागणे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

Back to top button