संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहरातील जोर्वे रस्त्यावरून जाणाऱ्या जोर्वे गावच्या आठ तरुणांना मारहाण करत दहशत माजविणाऱ्या १६ जणांना अहमदनगर जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा आणि संगमनेर शहर पोलिस पथकाने मुसक्या आवळत गजाआड केले.
संगमनेर शहरातील जोर्वे नाक्यावर परिसरातील नागरिकांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जोर्वे गावाकडे जाणाऱ्या पिकप चालकाने गर्दीतून मार्ग काढण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजविला. याचा राग आल्याने त्या परिसरातील तरुणांनी दहशत माजवीत ८ जणांना मारहाण केली होती. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सुमारे 150 जणांच्या विरुद्ध सोमवारी पहाटे दंगल घडविणे, दहशत माजविणे यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे सर्व गुन्हेगार फरार झाले होते. त्यांच्या मागावर पोलीस घटना घडल्याच्या दिवसापासून होते.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संगमनेरातील घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हेगारांना लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबतचे आदेश पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिले. त्यानंतर लगेचच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कोंबिंग सर्च ऑपरेशन राबवीत हल्लेखोरांची धरपकड सुरू केली. दोन दिवसात पोलिसांनी नईम कादर शेख, रेहान गुलाफाज पठाण, शेहबाज गफार शेख, आदत सय्यद अन्सार शेह बाज याकुब शेख, मोबीन मुबारक शेख, अमीर रफिक शेख आणि शेख इमरान दुश्मन पठाण, अल्ताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अहमद गुलाब नबी शेख, शकील नासीर पठाण, तोफिक आबू जर बिलाल शेख, शफीक शेख वइस्माईल, निसार पठाण अशा १६ हल्लेखोर आरोपींच्या मुस्क्या आवळत त्यांना गजाआड केले आहे. त्या सर्व हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. देशमुख यांनी या सर्वांना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : भोर
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या तरुणांना जोर्वे नाका परिसरातील काही तरुणांनी मारहाण केली होती. त्या हल्लेखोरांपैकी 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या परिसरात आता शांतता प्रस्थापित झालेली आहे. त्यामुळे कोणीकाही चुकीच्या गोष्टी करत असेल किंवा अशांतता पसरेल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकून अफवा पसरत असेल तर लगेच ती माहिती पोलिसांना कळवा. संगमनेरमधील नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
– स्वाती भोर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर