Nagar : नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून 15248 क्यूसेक विसर्ग

Nagar : नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून 15248 क्यूसेक विसर्ग

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  समन्यायी पाणी वाटपाचा कायदा 2005 मध्ये झाला. त्याचा बारमाही गोदावरी कालव्यांना 2012 मध्ये फटका बसला. पर्जन्यमान कमी होते तेव्हा गोदावरी बेसीनमधील धरणांतुन जायकवाडीस पाणी सोडण्यात येते. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जायकवाडी धरणात पाण्याची तुट असल्याने उर्ध्व भागातील धरणातुन 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांनी दिला. त्यास थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, पण तेथे दाद न मिळाल्याने शेवटी कायद्याने जायकवाडीत पाणी सोडण्यात आले.

पावसाळ्यानंतरही गोदावरी नदी पुन्हा वाहती झाली. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात गोदाकाठच्या गावकर्‍यांनी हे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. दारणा व गंगापूर धरणातुन अडीच टीएमसी पाणी गेल्याने त्याचा फटका रब्बी व उन्हाळ हंगामात मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे आहे. त्याच्या पाण्याचे कधीच वाटप होवु शकत नाही, मात्र शासनातील जलसंपदा खात्याचे तत्कालीन सचिव हिरालाल मेंढेगिरी या एक सदस्यीय समितीने जेव्हा दुष्काळ असेल, जायकवाडीत 15 ऑक्टोंबरपर्यंत जमा झालेले पाणी कमी असेल तर उर्ध्व भागात दारणा, गंगापूर, भंडारदरा, मुळा, निळवंडे या मोठ्या धरणांतुन किती पाणी सोडायचे, याचे कोष्टक ठरवून दिले. त्या कोष्टकानुसारचं पाणी सोडले गेले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने याबाबतचा तौलनिक अभ्यास करून 30 ऑक्टोंबर रोजी मुळातुन 2.10, भंडारदरा- निळवंडेतुन 3.10 तर दारणा समुहातुन 2.6 असे 8.6 टीएमसी पाणी सोडावे, म्हणून उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाशिक यांना आदेश केले होते. त्यानुसार त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

जायकवाडीला पाणी सोडु नये म्हणून अनेक ठिकाणी विरोध नोंदविला गेला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकारण्यांनी त्यांच्या 'हो' मध्ये 'हो' मिळविला. रस्त्यावरचा विरोध पाणी सुटले म्हणून तेवढ्या प्रमाणात दिसून आला नाही. यात नुकसान गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांचे झाले. जायकवाडीस पाणी सुटले आणि वरूणराजानेही त्याला साथ दिली. रविवारी नाशिक- नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. गोदाचा काठ ओला झाला. यामुळे जायकवाडीत 8 पैकी 4 टीएमसी पाणी पोहोचणार होते त्यात वरुणराजाच्या कृपेमुळे निश्चितच वाढ होणार आहे. गोदाकाठच्या गावांसह जायकवाडी बॅकवॉटर भागातील शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गोदावरी नदीवर बांधलेले बंधारेही पुन्हा भरणार आहेत. त्याचा दिलासा या शेतकर्‍यांना मिळणार आहे. दुधाची तहान ताकावर भागविली एव्हढेच काय ते जायकवाडीच्या पाण्याचे कवित्व जाणवेल, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पर्जन्यमान कमी झाले म्हणून प्रत्येकवेळी वरच्या धरणातुन पाणी सोडणे अव्यवहार्य आहे. याला कायमस्वरूपी उपाय म्हणून पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यात वळविलेचं पाहिजे, मात्र त्यासाठी पैशाची प्रचंड ताकद लागणार आहे. सध्या जे निळवंडे धरणाचे झाले तसे पुर्वेकडे वळविल्या जाणार्‍या पाण्याचे होवु नये एव्हढेच अन्यथा सध्याची जी धरणे बांधली आहेत. ती वाढत्या शहरीकरणांमुळे पिण्यासाठीच आरक्षीत होतील, हा संभाव्य धोका प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तहान लागल्यावर विहिर खोदणे हा त्यावरील उपाय नाही. यासाठी शासनाने अर्थसंकल्पातच यावर मोठ्या प्रमाणात तरतुद करायला पाहिजे, अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या,' असेच काहिसे..!

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news