आमदार राधाकृष्ण विखे पाटील अन् राष्ट्रवादीचे राहित पवार एकत्र; चर्चांना उधाण | पुढारी

आमदार राधाकृष्ण विखे पाटील अन् राष्ट्रवादीचे राहित पवार एकत्र; चर्चांना उधाण

नगर; कर्जत गणेश जेवरे : कर्जत येथील एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार हे एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये सुसंवाद झाला एवढेच नव्हे तर आमदार रोहित पवार हे स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडवण्यास गेले आणि हस्तांदोलनदेखील झाले. मात्र या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे.

कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज यांचा सोमवारी रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे हे दर्शनासाठी आले होते. पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे पालखी समवेत मंदिरापासून बाहेर काही अंतरावर थांबलेले होते. त्याचवेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे हे दर्शनासाठी आले होते ते थेट मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले.

याची माहिती आमदार रोहित पवार यांना मिळताच ते स्वतः मंदिराजवळ आले आणि मंदिराच्या बाहेर आ. राधाकृष्ण विखे-पाटील येताच  पवार यांनी त्यांची भेट घेतली. पालखी सोहळ्याची माहिती विखे पाटील यांना दिली. यानंतर आपली गाडी नेमकी कुठे लावली आहे. माझी गाडी बोलवू का? अशी विचारणा आमदार पवार यांनी केली व यानंतर हे दोन्ही नेते बोलत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी ज्या ठिकाणी लावली होती तिथपर्यंत गेले. आमदार विखे पाटील यांना गाडीत बसवून आमदार रोहित पवार परत पालखी सोहळ्याकडे आले.

संसदेमध्ये आरोप-प्रत्यारोप

नवी दिल्ली येथे झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आवर्जून सभागृहात कौतुक केले होते. दुसरीकडे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पवार विखे- पाटील कुटुंबामध्ये राजकीय संघर्ष निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते.

मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय वारसा चालवणारे युवा आमदार रोहित पवार यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत एका मुत्सद्दी राजकीय नेत्याप्रमाणे ज्येष्ठ असलेले राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करून व त्यांच्याबद्दल तितकाच आदर व्यक्त करत एक राजशिष्टाचार याठिकाणी पाळला.

मात्र या दोन नेत्यांमध्ये मन मोकळा झालेला संवाद नेमका काय होता याविषयी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.  पालखी सोहळ्यामध्ये देखील या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा रंगली होती.

हेही वाचलत का?

 

Back to top button