file photo
file photo

पाथर्डी : पोलिस सेवेत तब्बल 112 विद्यार्थ्यांची निवड

पाथर्डी(अहमदनगर); वृत्तसेवा : शहारातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची सुवर्णयशाची परंपरा कायम राखत, या वर्षीही तब्बल 112 विद्यार्थी महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने या वर्षी पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. त्यामध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे 112 व इतर ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र व खासगी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणार्‍या अनेक विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. संपूर्ण राज्यात पोलिस दलात भरती होण्याचा हा उच्चांक आहे.

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळून त्यांनाही नोकरीच्या संधी मिळाव्यात, ही दूरदृष्टी ठेवून माजी आमदार स्व. बाबुजी आव्हाड यांनी महाविद्यालयाची स्थापना केली. आज हे महाविद्यालय उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाबरोबरच त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे गावपातळीवरील विद्यापीठ ठरत आहे. गेल्या 10 वर्षांत महाविद्यालयाच्या ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच भव्य अशा क्रीडांगणाचा व पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांचा वापर करून 2 हजार 154 विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झाले आहेत.

पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मुलांची गरज लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच ग्रंथालयात स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तकांची व मासिकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना धावण्यासाठी 400 मीटर ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, गोळाफेक व उंचउडीसाठी स्वतंत्र मैदान आदी सुविधा निशुल्क पुरविण्यात आल्या. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. किरण गुलदगड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख, विद्यार्थी समुपदेशक डॉ. अभिमन्यू ढोरमारे, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचा विद्यार्थी नसतानाही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, क्रीडांगण व इतर सुविधांचा निशुल्क वापर करता आला. त्यामुळे आम्ही आज पोलिस दलात भरती झालो. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांचा मोलाचा वाटा आहे.

                                            – गणेश एकनाथ धस, मुंबई पोलिस.

घरची परिस्थिती हालाखीची आहे. आई- वडील मजुरी करून आमच्या दोन बहिणींचा उदरनिर्वाह करतात. आर्मी किंवा पोलिस दलात निवड होण्यासाठी आव्हाड महाविद्यालयात एनसीसीत प्रवेश घेतला. त्याचा फायदा होऊन माझी पोलिस दलात निवड झाली.

                                                   – सृष्टी बाजीराव गर्जे, ठाणे शहर पोलिस.

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर महाविद्यालयाने मला व बहिणीला मायेचा हात दिला. सहा वर्षापूर्वी बहिणीची व आता माझी पोलिस दलात निवड झाली. महाविद्यालयाचा विशेष ऋणी आहे.
                                               – गणेश शिवाजी फुंदे, मुंबई पोलिस

logo
Pudhari News
pudhari.news