

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीव्दारे आलेल्या 265 शिक्षकांना जिल्ह्यात पदस्थापना दिली जाणार आहे. मात्र, या 265 शिक्षकांमध्ये तब्बल 107 शिक्षक हे दिव्यांग असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी योग्य ती तपासणी करूनच संबंधितांना पदस्थापना द्यावी, असा सामाजिक संघटनेचा सूर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावरून नगर जिल्हा राज्यात चर्चेत आला होता. त्यानंतर प्रशासनाने याविषयी आवश्यक ती दक्षताही घेतली. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांत 'बाहेर'हून 265 शिक्षकांची नगरला बदली झाली आहे.
यापैकी 150 शिक्षक हे नगरला मुख्यालयात पोहचले आहेत, तर 100 शिक्षकांना अजूनही पूर्वीच्या ठिकाणाहून सोडलेले नाही. लवकरच या सर्व शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागा असलेल्या शाळांवर समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे. त्यासाठी सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी याबाबतचे नियोजन केले आहे.
संवर्ग एकमधील शिक्षकांना सर्वात प्रथम पदस्थापना दिली जाणार आहे. या संवर्गात दिव्यांग, दुर्धर आजार, विधवा इत्यादी वर्गातील शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वंग दोनमध्ये पती-पत्नी आणि संवर्ग तीनमध्ये सर्वसाधारण वर्गातील शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. मात्र, यातील पहिल्या संवर्गातच 265 पैकी 107 शिक्षक मोडत असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.
एकीकडे नक्षलवादी भाग असेल, किंवा अतिमागास प्रवर्ग, तसेच शासकीय विभागांमध्ये दिव्यांगांची संख्या घटती असताना, दुसरीकडे शिक्षण विभागात मात्र दिव्यांगाची आकडेवारी अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सीईओ आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी संबंधित वर्गातील पदस्थापना देण्यापूर्वी आवश्यक ती कागदोपत्री तसेच आरोग्य तपासणी केल्यानंतरच कार्यवाही करावी, अशीही मागणी प्रहारच्या वतीने केली जात आहे.
दिव्यांगांची संख्या कमी होत असताना काही विभागात ही आकडेवारी संशय निर्माण करणारी आहे. काही ठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांचा लाभ मिळविला गेल्याचे यापूर्वीही पुढे आले आहे. त्यामुळे सीईओ आणि शिक्षणाधिकार्यांनी दिव्यांगप्रश्नी पुन्हा तपासणी करूनच योग्य लाभार्थ्यांना लाभ द्यावा.
-मधुकर घाडगे, तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना
खोटी माहिती ; एक वेतनवाढ रोखणार
शिक्षकांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती भरली, तर संबंधितांची एक वेतनवाढ रोखली जाईल, अशा शिक्षेची तरतूद आहे. वास्तवात ही शिक्षा कठोर नसल्याने अजूनही खोटी माहिती सादर केली जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी असे सुमारे 70 शिक्षक रडारवर होते. यापैकी 32 लोकांवर कारवाई झाली, बाकीच्यांचे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे.
जिल्हांतर्गत बदल्या लांबणीवर
शिक्षकांच्या पारदर्शी बदल्या करण्यासाठी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र पोर्टल सुरू केले. त्यामध्येही अनेकदा अडचणी आल्या. त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या झाल्या. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदल्या लांबणीवर पडल्या. आता प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यात ह्या बदल्या झाल्या, तर पूर्वीचे शिक्षक आणि नवीन शिक्षक यांची शिकविण्याची पद्धत आत्मसात करायला विद्यार्थ्यांना कठीण जाणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या बदल्या ह्या मे 2023 मध्येच कराव्यात, असाही सूर आहे. तर काही शिक्षकांच्या मते दिवाळीनंतर या बदल्या झाल्यातर योग्य असेल.