शिक्षक बँकेचे 10464 मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध,13 जूनला प्रोग्राम?

शिक्षक बँकेचे 10464 मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध,13 जूनला प्रोग्राम?
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक बँकेच्या 10502 सभासदांच्या प्रारुप मतदार यादीतील 38 सभासदांची नावे वेगवेगळ्या कारणांनी कमी झाल्याने 10464 सभासदांची अंतिम यादी सहकार विभागाने सोमवारी प्रसिद्ध केली आहे. 15 दिवसात बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागणार असल्याने शिक्षक संघटना तयारीला लागल्या आहेत.शिक्षक बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.

बापूसाहेब तांबे यांचे सत्ताधारी गुरुमाउली आणि फूट पडून सवता सुभा मांडलेले रोहकलेप्रणित 'गुरुमाउली' मंडळ निवडणूक युद्धासाठी सज्ज आहे. गुरुकुलचे डॉ. कळमकर हे 'तांबे-रोहकले'च्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत, तर सदिच्छा, शिक्षक भारती, इब्टा, स्वराज्य, वंचित इत्यादी संघटनाही आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी 'आघाडी'ची बांधणी करत आहेत.

त्यामुळे येणारी निवडणूक चांगलीच गाजणार आहे. दरम्यान, पहिल्या आठवड्यात प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 11 मे पर्यंत हरकती घेण्यात आल्या. त्यात बोटावर मोजण्याइतपत हरकती आल्या. त्यात सेवानिवृत्तांची नावे, अन्य तालुक्यातील नावे इत्यादीचा आक्षेप होता. त्यावर 23 मे रोजी सुनावणी घेऊन काल सोमवारी 30 मे रोजी 10464 मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली.

15 दिवसांत प्रोग्राम लागणार

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवसांनंतर आणि 20 दिवसांच्या आत निवडणुकीचा प्रोग्राम लागणार आहे. त्यामुळे 10 किंवा 13 तारखेला 21 जागांसाठी ही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी 1 प्रमाणे 14 संचालकांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक गणेश पुरी हे काम पाहणार आहेत.

विभाग               सभासद
राहुरी                  781
शेवगाव               667
श्रीगोंदा               955
अकोले             1018
कर्जत                687
राहाता-कोपरगाव 299
राहाता-श्रीरामपूर 240
भिंगार कॅन्टोंन्मेंट 307
संगमनेर          1059
नगर                772
पारनेर             851
कोपरगाव        573
श्रीरामपूर        465
जामखेड         439
पाथर्डी           750
नेवासा           908

स्वराज्य मंडळ ही कोरी पाटी असून, कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. नव्या पिढीला अनुसरून बँकेत सुविधा द्यायच्या असतील, तर जुनी जळमटे काढून नव्या दिशेने झेप घेतल्याशिवाय सभासदांना पर्याय नाही. आमच्याशिवाय इतर कोणतेही मंडळ आता विश्वासाला पात्र उरलेले नाही.
-सचिन नाबदे, जिल्हाध्यक्ष, स्वराज्य.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत इब्टाप्रणित बहुजन मंडळाने स्वबळाची तयारी केली आहे. यापूर्वी सत्तेवर आलेल्यांनी सभासदांचा विश्वासघात केला आहे. यावेळी जिल्ह्यातील स्वाभिमानी शिक्षकांना आम्ही स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी बहुजन मंडळाचा पर्याय देणार आहोत.

-एकनाथ व्यवहारे, अध्यक्ष, इब्टा (बहुजन)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news