

नगर : पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकनिमित्त आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची राजकीय पक्ष व उमेदवारांनी दक्षता घ्यावी. खासगी अथवा सरकारी मालमत्ता विद्रुपित केल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी 1 लाख 16 हजार 319 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत असल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 30 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता, व्हिडिओग्राफी कक्ष व स्टॅटीक सर्व्हिलन्स टीम तयार करण्यात येणार आहे. आचारसंहिता काळात केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार व इतर पदाधिकारी यांना मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणत्याही प्रकारची उदघाटने, घोषणा, शासकीय दौरे तसेच आढावा सभा घेता येणार नाहीत.
दि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रापर्टी अॅक्ट 19195 व भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक लावून मालमत्ता विद्रप करण्यास बंदी आहे. ज्या कोणी असे प्रकार केले असतील त्यांनी ते तत्काळ काढून टाकण्यात यावे अन्यथा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची पत्कारावा लागणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
या मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, 1 लाख 16 हजार 319 मतदारांचा यादीत समावेश आहे. यामध्ये 35 हजार 609 महिला मतदारांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 624 मतदारसंख्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार डॉ. चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी हे उपस्थित होते.
नाशिक मतदारसंघात एकूण 2 लाख 58 हजार 444 मतदारसंख्या आहे. यामध्ये सार्वधिक नगर जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार 319 मतदारांचा समावेश आहे. याशिवाय नंदुरबार 19279, जळगाव 33544, नाशिक 66709 तर धुळे जिल्ह्यात 22 हजार 593 मतदारसंख्या आहे.
आचारसंहिता काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय पदाधिकारी यांना शासकीय वाहने वापरण्यास निर्बंध असणार आहेत. त्यानुसार महापालिकेतील पदाधिकार्यांची वाहने काढून घेण्यात आली आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शासकीय वाहने आता वापरता येणार नाहीत. जिल्हा परिषद व नऊ नगरपालिकांवर गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक राजवट सुरु आहे.
अकोले 8309, संगमनेर 29624, राहाता 15354, कोपरगाव 8387, श्रीरामपूर 8092, राहुरी 7849, नेवासा, 6921, नगर 10288, पाथर्डी 4424, पारनेर 3616, श्रीगोंदा 4309, कर्जत 2872, जामखेड 2052. जिल्ह्यात एकूण
या निवडणुकीसाठी महसूल मंडळस्तरावर मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी 147 केंद्र नगर जिल्ह्यात निश्चित केले आहेत.
मतपत्रिकेचा होणार वापर
या निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. पदवीधर मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करणे बंधनकारक असणार आहे.