Nagar News : नवरात्रोत्सव काळात मोहटादेवी चरणी 1.65 कोटीचे दान

Nagar News : नवरात्रोत्सव काळात मोहटादेवी चरणी 1.65 कोटीचे दान

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शारदीय नवरात्रोत्सव काळात राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी सुमारे एक कोटी 65 लाखांचे दान अर्पण केले आहे. यामध्ये रोख रक्कम, सोने व चांदी यांचा समावेश आहे. मोहटादेवी गडावर देवस्थानच्या दानपेट्यांची मोजदाद येथील धर्मादाय उपायुक्तांचे प्रतिनिधी उमाकांत फड, देवस्थान विश्वस्त, पाथर्डी येथील सराफ मे.काशीनाथ वामन शेवाळे, पोलिस व देवस्थान सुरक्षा, सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये करण्यात आली. यामध्ये पेटीतील रोख रक्कम 1 कोटी 1 लाख 2 हजार, देणगी पावत्यांद्वारे 33 लाख 76 हजार 760, कावड, पालखी एकत्रित 2 लाख 20 हजार 625, ऑनलाईन 5 लाख 12 हजार 400, सोने 267 ग्रॅम मूल्यांकन रूपये 16 लाख 31 हजार, चांदी वस्तू 9 किलो 125 ग्रॅम मूल्यांकन रूपये 6 लाख 84 हजार 600, अशा विविध स्वरूपात 1 कोटी 65 लाखांची देणगी देवस्थानास प्राप्त झाली.

वेळेअभावी देणगीची मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या लाखो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे भरभरून दान देवीच्या चरणी अर्पण केले. देवी नवसाला पावते, अशी भक्तांमध्ये अफाट श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी भक्त रोख स्वरूपात, सोन्याच्या व चांदीच्या वस्तू, देणगी पावती अशा स्वरूपात भरभरून दान करतात.

मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, अ‍ॅड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, श्रीराम परताणी, बाळासाहेब दहिफळे, प्रतिभा दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या, अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news