नियमबाह्य वाहन चालकांना 1.16 कोटीचा दंड

नियमबाह्य वाहन चालकांना 1.16 कोटीचा दंड
Published on
Updated on

गोरक्ष नेहे : 

संगमनेर : पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविणार्‍यांवर तसेच महामार्ग वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहने चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात मागील वर्षांपासून दाखल झालेल्या अत्याधुनिक स्पीडगन मशिनची करडी नजर राहत आहे. या मशीनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 1 कोटी16 लाख 77 हजार 600 रुपयांचा बेशिस्त आणि नियमबाह्य वाहने चालविणार्‍या वाहन चालकांना दंड केल्याची माहिती डोळासने महामार्ग पोलिस उपकेंद्राचे स.पो. नि. सचिन सूर्यवंशी यांनी दै पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वाधिक वर्दळीचा असणारा महामार्ग म्हणून पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाला ओळखले जाते. या महामार्गाचे मागील काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरून रात्रं-दिवस मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरू असते. महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांकडे मात्र कोणताही वाहन चालक फारसे लक्ष न देता वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतात. यामुळे वाहन चालकांना आपल्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी व अपघात झाल्यास त्यास तत्काळ मदत व्हावी, म्हणून डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्र कार्यरत करण्यात आले.

डोळासने महामार्ग पोलिसांच्या ताफ्यामध्ये मागील वर्षापासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी स्पीडगन हे अत्याधुनिक प्रणालीचे मशीन दाखल झाले आहे. हे मशीन कार महामार्गावर उभे केले जाते. येणारा -जाणार्‍या वाहनांचा वेग आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे छायाचित्र, गाडीचा नंबर आणि त्याचा वेग या मशीनमध्ये कैद होतो. त्यानंतरच वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकास कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्याच्या बँक खात्यामधून दंड वसूल करण्याचे काम मशीनमुळे सुलभ होत आहे.

महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डोळसणे वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या वतीने 10 पोलिस कार्यरत आहेत. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, महामार्गावरील सूचना फल कांकडे लक्ष द्यावे, वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावे, अपघात टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी वाहन चालकांना केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस कारवाईची चर्चा सुरु आहे.

7 हजार 614 वाहन चालकांना दंड..!
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासाठी अत्याधुनिक 'स्पीडगन' मशिनद्वारे अति वेग, सीटबेल्ट नसणे, माल वाहतूक आदी नियम मोडणार्‍या तब्बल 7 हजार 614 वाहन चालकांवर 9 एप्रिल ते 28 सप्टेंबर 2022 या 6 महिन्यांच्या कालावधीत 1 कोटी 16 लाख 77 हजार 600 रुपये दंडात्मक कारवाई केली. यापैकी आत्तापर्यंत 51 लाख 91 हजार 200 रुपये दंड वसूल केल्याची माहिती डोळासणे महामार्ग वाहतूक पो. उ.नि. सचिन सूर्यवंशी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news