

नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रीडांगण विकास योजनेच्या प्रस्तावासोबत आमच्या शाळेचे कोरे लेटरहेड घेण्यात आले. पुढे कामही परस्पर दिले. आता मैदानाचे कामही बोगस झाल्याचे एसएमसीचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनच्या बैठकीत एक रुपयाही ठेकेदाराला द्यायचा नाही, असा निर्णय अनापवाडीसह अन्य काही गावांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
अनापवाडीचे मुख्याध्यापक घोलप भ्रमणध्वनीवरून म्हणाले की, प्रस्ताव सादर करताना आमच्याकडून कागदपत्रे घेतली. प्रसिद्धीसाठी शाळेचे लेटरहेड लागणार आहेत, असे सांगितल्याने आम्ही शाळेच्या शिक्क्यांचे स्वाक्षरीसह कोरे लेटरहेड दिले. योजनेत शाळा पात्र ठरल्यानंतर कामही परस्पर दिले. ठेकेदाराने व्यवस्थित काम केले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनने त्याचे बील देण्यास नकार दिला आहे, तर ठेकेदार मात्र 6 लाख 84 हजारांचा धनादेश मागत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अशाप्रकारे अनेक गावांत शाळा व्यवस्थापनने निकृष्ट कामाचे बिले रोखल्याचे सांगितले जात आहे.
अधिकारी, ठेकेदारानंतर पावसानेही धुतले !
अधिकारी व ठेकेदारांनंतर आता पावसानेही क्रीडांगणावर हात धुवून घेतला आहे. कालच्या पावसात ठेकेदाराने टाकलेला मुरूम वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मैदाने पुन्हा खराब झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे या मैदानात कशाप्रकारे निकृष्ट काम झाले हे स्पष्ट झाले आहे.
सीईओ येरेकर चौकशी लावणार !
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बँक खात्यात निधी येत असेल, तर तो कसा वापरला याची माहिती मुख्याध्यापकांना द्यावी लागणार आहे. सीईओ आशिष येरेकर हे संबंधित शाळांनी आपली कामे स्वतः का केली नाही, ती कामे कुणी दिली, टेंडर कुणी काढले, शिक्षण विभागाला याबाबत माहिती आहे का, इत्यादीची माहिती घेणार आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना सीईओंनी महत्त्वपूर्ण सूचना केल्याचेही सूत्रांकडून समजले.