

नगर : पुढारी वृत्तसेवा : 'डॉक्टर्स डे'निमित्त आयएमए व ट्रेककॅम्पच्या संयुक्त विद्यमाने मांजरसुंबा गडावर ट्रेकिंगचे आयोजन करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नगर शहराजवळ निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळे आहेत. चांदबीबी महाल, भुईकोट किल्ला, मांजरसुंबा गड आदी ठिकाणचा परिसर कचरा, प्लॅस्टिक व बाटल्यांमुळे गलिच्छ झाला होता. त्याची साफसफाई करण्यात आली. या शहराचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगबरोबरच सामाजिक कार्याचा आनंद उपस्थितांनी घेतला.
याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन पांडुळे, लेडिज विंगच्या अध्यक्षा डॉ. रेणुका पाठक, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सारिका बांगर, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. शहेनाज अय्यूब, डॉ. दीपा मोहोळे, डॉ. सोनाली वहाडणे, डॉ. ज्युली वानखेडे, डॉ. रुपाली नेमाणे, डॉ. स्मिता पठारे, डॉ. आदिती पानसंबळ, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. पांडुळे म्हणाले की, मांजरसुंबा गड या परिसरातील सर्वांत उंच गड आहे. मांजरसुंबा हे नाव मंजर-ए-सुबा या नावातून निर्माण झाले. नगर ऐतिहासिक व निसर्गसुंदर शहर आहे. शहराची शोभा वाढविण्यासाठी आज आयएमएचे पदाधिकारी व सदस्य डॉक्टर्स यांनी येथे स्वच्छता मोहीम राबविली. सकाळच्या आरोग्यदायी व स्वच्छ हवेत व्यायामासोबत सामाजिक कार्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे असून, त्यांची स्वच्छता गरजेची आहे. लेडिज विंग अध्यक्षा डॉ. पाठक म्हणाल्या की, सामाजिक भावनेतून यापुढील काळातही आयएमएच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. पुढील रविवारी आयएमएच्या वतीने वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येईल.