

Savitribai Phule Viral Photo Fact Check: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची काल जयंती होती. काल दिवसभर फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर समाजमाध्यमांवर एक जुना फोटो सावित्रीबाई फुले यांचा असल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. मात्र हा दावा चुकीचा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहासाचे संशोधक विद्यार्थी बापूराव घुंगरगांवकर (Savitribai Phule Pune University) यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट करत या फोटोबाबतची खरी माहिती समोर आणली आहे. त्यांच्या पोस्टनुसार, समाजमाध्यमांवर फिरणारा हा फोटो सावित्रीबाई फुले यांचा नसून, सावित्रीबाई फुले यांचे पहिले चरित्रकार कु. शांताबाई रघुनाथराव बनकर यांच्या आईचा आहे. त्यांचं नाव सौ. जानकीबाई रघुनाथराव बनकर असं आहे.
कु. शांताबाई बनकर यांनी सन 1939 साली ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई फुले यांचे अल्पचरित्र’ हे पुस्तक लिहिलं होतं. विशेष म्हणजे हे चरित्र त्यांनी आपल्या आईस म्हणजेच सौ. जानकीबाई रघुनाथराव बनकर यांना अर्पण केलं आहे. त्यामुळे संबंधित फोटो हा त्यांच्या आईचा असून, सावित्रीबाई फुले यांचा नाही, हे स्पष्ट होतं.
या चरित्राची मूळ प्रत पुणे विद्यापीठ प्रेसमध्ये उपलब्ध असून, पुस्तकाचे संपादक प्रा. विश्वनाथ शिंदे आणि प्रा. श्रद्धा कुंभोजकर आहेत. या पुस्तकाची किंमत सध्या 200 रुपये असल्याची माहितीही बापूराव घुंगरगांवकर यांंनी दिली आहे.
बापूराव घुंगरगांवकर यांनी सांगितलं की, हा फोटो सावित्रीबाई फुले यांचा असल्याचा दावा करत अनेक लोकांनी काल दिवसभर चुकीचा फोटो शेअर केला. याचे स्क्रीनशॉटही त्यांनी दिले आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांची चुकीची माहिती पसरवली जाणं ही गंभीर बाब आहे. इतिहास, व्यक्ती आणि त्यांच्या कार्याबाबत माहिती शेअर करताना संदर्भ, पुरावे आणि विश्वासार्ह स्रोत तपासणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, नकळत चुकीचा इतिहास पसरवला जाऊ शकतो. त्यामुळे इतिहासाबाबतची कोणतीही माहिती शेअर करताना ती खात्री करुनच शेअर करावी.