Water Crisis Nashik | नाशिककरांवरील जलसंकट गडद

Water Crisis Nashik | नाशिककरांवरील जलसंकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – १५ जूनची तारीख उलटली तरी अद्यापही त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच मुकणे व दारणा धरणातील जलपातळी वाढू शकलेली नाही. गंगापूर आणि मुकणे धरणात महापालिकेसाठी जेमतेम ५४८ दशलक्ष घनफुट इतकेच पाणीआरक्षण शिल्लक राहिले असून, ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १९ दिवसांचा शॉर्टफॉल असल्याने नाशिककरांवरील जलसंकट आता गडद बनले आहे. येत्या आठवडाभरात धरणक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यास नाशिककरांना जबर पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याकरीता नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आल्याने नाशिक महापालिकेच्या पाणीआरक्षणात तब्बल ८०० दशलक्ष घनफूटाने कपात करण्यात आली. नाशिक शहराच्या पिण्यासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी गंगापूर धरण समुहातून ३८०७, दारणा धरणातून १०० तर मुकणे धरणातून १४०७ असे एकूण ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला. कमी पाणी आरक्षणामुळे ३१ जुलै अखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीकपात करणे आवश्यक होते. परंतु, लोकसभा निवडणूकांमुळे लोकप्रतिनिधींनी कपातीला विरोध केल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय टळला. १५ जून लोटल्यानंतरही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. नाशिक शहरात पावसाची हजेरी असली तरी, त्र्यंबकेश्वर, इगतपूरी परिसराला अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीपुरवठा आणि पालिकेचे आरक्षण पाहता सध्यस्थितीत ४०० दशलक्ष घनफुट पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

गंगापूर, मुकणे आणि दारण धरणातून नाशिक शहरासाठी दररोज १९.५६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. धरणांतील शिल्लक पाणीआरक्षण केवळ ४५ दिवस पुरणारे आहे. दररोज १९.५६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा कायम ठेवल्यास ३१ जुलै अखेरपर्यंत १६ दिवसांचा तुटवडा निर्माण होणार आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. आठवडाभरात दमदार पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ बनणार आहे.

  • शहरात दररोज पाणीवापर- १९.५६ दशलक्ष घनफुट
  • गंगापूर धरणातून उचल – १३.८४
  • मुकणे व दारणातून उचल – ५.७२
  • पाणी आरक्षण शिल्लक दिवस – ४६
  • एकूण पाण्याचा शॉर्टफॉल – १९ दिवस

धरण                            शहरासाठी पाण्याचे आरक्षण            आतापर्यंत पाणीउचल            शिल्लक पाणीसाठा
(दशलक्ष घनफुटात)
गंगापूर धरण                                   ३८०७                                     ३३६४                                ४३१
दारणा व मुकणे धरण                        १५०७                                     १३९०                                ११७
एकुण आरक्षण                                 ५३१४                                     ४७५४                               ५४८

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news