Nashik | शिरसगाव शिवार परिसरात विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे झाले नुकसान

निफाड : शिरसगाव शिवारात तांत्रिक बिघाडानंतर द्राक्षबागेत कोसळलेल्या सुखोई विमानाला लागलेली आग. (छाया: दीपक श्रीवास्तव)
निफाड : शिरसगाव शिवारात तांत्रिक बिघाडानंतर द्राक्षबागेत कोसळलेल्या सुखोई विमानाला लागलेली आग. (छाया: दीपक श्रीवास्तव)

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – भारतीय हवाई दलाचे सुखोई -३० हे लढाऊ विमान मंगळवारी (दि. 4) दुपारी १ च्या सुमारास ओझर येथील एचएएल विमानतळावरून नियमित उड्डाणाचा सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे एका शेतात कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत सीट इजेक्ट केल्याने त्यांचा जीव बचावला. परंतु विमान कोसळताना झालेल्या तीव्र स्फोटाने शिरसगाव परिसर हादरल्याने नागरिकांनी भीतीने घराबाहेर धाव घेतली.

दुपारी १ च्या सुमारास ओझर येथील हवाई दलाच्या विमानतळावरून नियमित सरावासाठी सुखोई-३० ने उड्डाण घेतले. परंतु अवघ्या काही क्षणात विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे दोघा वैमानिकांच्या लक्षात येताच त्यांनी सीट इजेक्ट केले आणि ते विमानातून सुखरूपपणे बाहेर आले. त्यानंतर विमान गिरक्या घेत वेगाने खाली आले आणि शिरसगावच्या द्राक्ष आणि टोमॅटोच्या शेतात पडले. त्यावेळी मोठा स्फोट झाला. मोठा आवाज होत विमान कोसळत असल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विमान संपूर्णपणे क्षतिग्रस्त होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. बचावकार्य सुरू व्हायच्या आतच विमानाची अक्षरशः राख रांगोळी झाली. फक्त इंजिनाचा काही भाग शेतात आढळला. विमान ज्या शेतात कोसळले तेथील द्राक्षबागा, कांदा, टोमॅटो शेतीचा काही भाग जळून खाक झाला.

अतिशय उंचावरून पॅराशूटच्या सहाय्याने खाली येताना दोघा वैमानिकांना दुखापत झाली. घटना स्थळापासून जवळच्या शेतात दोघे पायलट जखमी अवस्थेत नागरिकांना आढळले. नागरिकांनी तातडीने त्यांना उचलून झाडाखाली आणत प्राथमिक उपचारासाठी मदत केली. काही क्षणातच लष्कराचे हेलिकॉप्टर तेथे आले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ओझर टाऊनशिप येथे लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत विमान पडलेल्या अवशेषाभोवती बंदोबस्त करत नागरिकांना हटविले. सायंकाळी उशिरा शेतातील सर्व अवशेष लष्कराच्या कर्मचाऱ्यांनी हटविले.

निफाड : शिरसगाव शिवारात तांत्रिक बिघाडानंतर द्राक्षबागेत कोसळलेल्या सुखोई विमानाचे पंखे आणि अन्य भागाचे झालेले तुकडे. (छाया : दीपक श्रीवास्तव)
निफाड : शिरसगाव शिवारात तांत्रिक बिघाडानंतर द्राक्षबागेत कोसळलेल्या सुखोई विमानाचे पंखे आणि अन्य भागाचे झालेले तुकडे. (छाया : दीपक श्रीवास्तव)

या शेतकऱ्यांचे झाले नुकसान

शिरसागाव शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांच्या टोमॅटोच्या क्षेत्रात विमान कोसळे तसेच सुखदेव मोरे यांच्या द्राक्ष बागेला आग लागल्याने नुकसान झाले आहे. या शिवाय मदत कार्य तसेच नागरिकांनी विमानाकडे धाव घेतल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे.

सहा वर्षांपूर्वी देखील बुधवारी दि.२७ जून २०१८ रोजी पिंपळगाव बसवंतजवळ वावी-ठुशी गावालगत (ता. निफाड) लष्कराचे सुखोई-३० विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news