Dhule Lok Sabha Election Results 2024 Update | भाजपचा पुनर्मतमोजणीचा अर्ज, निकालाचा निर्णय रखडला

धुळे : दोन इव्हीएम मशिनचे डिस्प्ले बंद असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चर्चाविनिमय करताना कॉग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव, कुणाल पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल.
धुळे : दोन इव्हीएम मशिनचे डिस्प्ले बंद असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चर्चाविनिमय करताना कॉग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव, कुणाल पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल.

धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळे लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर काँग्रेसच्या डाॅ. शोभा बच्छाव यांनी २१ व्या फेरीअखेर ३८२५ मतांची आघाडी घेतल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची हॅटट्रिक हुकली आहे. दरम्यान, शेवटच्या फेरीपर्यंत निकालाविषी परस्परविरोधी संदेश फिरल्याने मोठा संभ्रम पसरला. मात्र, २१ वी फेरीअखेर बच्छाव यांना ३८२५ मतांची आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे. परंतु, सर्व सहा विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येकी पाच इव्हीएमसोबतच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठीची मोजणी केल्यानंतरच अधिकृतपणे निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत रॅण्डम मतमोजणी आणि निर्णयदेखील रखडला आहे.

प्रारंभीपासूनच मतमोजणीत नाट्यमय घडामोडी

धुळे लोकसभेच्या आखाड्यात १८ उमेदवार होते. यात प्रमुख लढत काँग्रेसच्या डॉ. बच्छाव आणि भाजपचे खासदार डॉ. भामरे यांच्यात झाली. या मतदारसंघातून एकूण १२ लाख १७ हजार ४२३ (६०.२१ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी सकाळी आठपासून नगाव बारी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्येदेखील उत्सुकता वाढीस लागली. चौथ्या फेरीपासून डॉ. भामरे यांनी आघाडी घेणे सुरू केली. ही आघाडी सातव्या फेरीअखेर २१ हजारांपर्यंत पोहोचली. मात्र, अकराव्या फेरीमध्ये डॉ. बच्छाव यांनी ही आघाडी मोडीत काढत १३ हजार ५६८ मतांची आघाडी घेतली. ती बाराव्या फेरीपर्यंत १९ हजार ७४० मतांपर्यंत गेली. मात्र, पुन्हा चौदाव्या फेरीमध्ये भाजपने आघाडी घेतली. या सर्व घडामोडी घडत असतानाच अठराव्या फेरीअखेर दुपारी तीनच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. तेव्हा डॉ. भामरे यांना ३६६३ मते मिळाली असून, 'मालेगाव मध्य'च्या सर्व फेऱ्या झाल्याने विजयी झाल्याचा दावा करण्यात आला. तो व्हायरल झाल्याने मतदारसंघातही जल्लोष वाढला.

मात्र, वस्तुस्थिती वेगळी होती. प्रशासनाने उमेदवारांना मिळालेली मते ही कायदेशीर पद्धतीने तपासणी करून देत असतानाच या आकडेवारी बाहेर येण्यासाठी उशीर झाला. प्रशासनाच्या वतीने दहावी फेरी आली. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून अठराव्या फेरीपर्यंतचे निकाल अंदाजे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे हा गोंधळ सुरू झाला. दरम्यान, मतमोजणी केंद्रात डॉ. भामरे तसेच डॉ. बच्छाव यांच्यासह आमदार कुणाल पाटील, दिनेश बच्छाव व अन्य नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, प्रशासनाने अठराव्या फेरीचा निकाल जाहीर केला. यात बच्छाव यांना पाच लाख ७९ हजार १७२ मते, तर भामरे यांना पाच लाख ७१ हजार ३८१ मते मिळाली होती. त्यानुसार बच्छाव यांना सुमारे आठ हजारांची बढत मिळाल्याचे जाहीर झाले. तर १९व्या फेरीमध्येदेखील बच्छाव यांना पाच लाख ८२ हजार १४९, तर डॉ. भामरे यांना पाच लाख ७६ हजार ९९४ मते मिळाली. बच्छाव ५ हजार १५५ मतांनी आघाडीवर होत्या.

मतमोजणीदरम्यान दोन मशीनचे डिस्प्लेच बंद

४ हजार ४१८ पोस्टल मतदानापैकी ४०२ आणि २४६ मते अवैध ठरली. उर्वरित ३६७० वैध मतांपैकी बच्छाव यांना १३७४, तर भामरे यांना २००७ मते मिळाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतमोजणीदरम्यान दोन मशीनचे डिस्प्ले बंद पडल्यामुळे या मशीनसोबतच्या व्हीव्हीपॅटमध्ये असलेल्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार मोजणी होऊन बच्छाव यांना ३ हजार ८२५ मतांची आघाडी मिळाली. ही आघाडी निर्णायक असून, आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघांतील ३० मशीनच्या चिठ्ठ्यांची मोजणी केल्यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांचा जीव टांगणीला लागला.

दरम्यान, भाजपच्या वतीने माजी महानगरप्रमुख तथा धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे पुनर्मतमोजणी करण्याचा अर्ज केला. या अर्जावरदेखील जिल्हाधिकारी गोयल यांच्यासमोर कामकाज होणार असून, त्यानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे.

धनशक्ती विरोधातील विजय : डॉ. बच्छाव

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे. मतदारांनी लोकशाही, संविधान आणि शेतकरी वाचवण्यासाठी मतदान केले. शेतकरी, अल्पसंख्याक, आदिवासी आणि मतदार यांचा हा विजय आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास यालाच प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया डॉ. शोभा बच्छाव यांनी यावेळी नोंदवली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news