Good News! मान्सूनची केरळसह ईशान्य भारतात हजेरी! | पुढारी

Good News! मान्सूनची केरळसह ईशान्य भारतात हजेरी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात गुरुवारी दुपारच्या सुमारास एकाच दिवशी दाखल झाला आहे. यंदा तो दोन्ही ठिकाणी वेळेआधीच पोहोचला आहे. केरळात दोन दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी आल्याने तळकोकणात 3 जून, तर मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात 5 ते 6 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला. यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने 15 मे रोजीच दिला होता.

तो खरा ठरला आहे. ‘अल निनो’ची स्थिती संपून ‘ला निना’ सक्रिय झाल्यामुळे 19 मे रोजी मान्सूनचे वारे अंदमानात धडकले. त्यानंतर 24 मे रोजी ‘रेमल’ चक्रीवादळ आले. त्यामुळे मान्सूनला गती मिळाली. मान्सून दरवर्षी केरळमध्ये 1 जून रोजी येतो, तर ईशान्य भारतात चार-पाच दिवसांच्या अंतराने दाखल होतो. मात्र, यंदा तो केरळमध्ये नियोजित तारखेपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी, तर ईशान्य भारतातही एकाच दिवशी दाखल झाल्याने तो संपूर्ण देशात वेगाने प्रवास करेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

दोन्ही शाखांची एकाच वेळी एन्ट्री

मान्सून अरबी समुद्रातून केरळमध्ये आणि बंगालच्या उपसागरातून समुद्राच्या पूर्व शाखेने ईशान्य भारतात 30 मे रोजी दाखल झाला. अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य, आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप क्षेत्र, केरळचा बहुतांश भाग, माहे, दक्षिण तामिळनाडूचा काही भाग, उर्वरित मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राच्या काही भागांत पोहोचला आहे. तसेच संपूर्ण ईशान्य भारतातील बहुतांश भाग नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा बहुतांश भाग व्यापला आहे.

संबंधित बातम्या

‘रेमल’ चक्रीवादळाने दिली गती

यंदा मान्सून नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला, तर ईशान्य भारतात तो किमान पाच ते सहा दिवस आधीच आला. हवामानतज्ज्ञांच्या मते, ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सून वार्‍यांना अनुकूल वातावरण तयार करून दिले. बंगालच्या उपसागरातून केरळमध्ये येणारी पहिली शाखा आणि बंगालच्या उपसागरातून दुसर्‍या शाखेला गती मिळाली. पश्चिम बंगालमार्गे ईशान्य भारतात मान्सून दुसर्‍या शाखेने एकाच दिवशी पोहोचला.

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

केरळात मान्सून दाखल होताच राज्यात वार्‍यांचा वेग वाढला आहे. बहुतांश भागांत ढगाळ वातावरणामुळे उष्मा जाणवत आहे. 31 मे ते 5 जून या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

पुण्यात 5 किंवा 6 जून रोजी दाखल होणार

मान्सून वार्‍यांचा वेग प्रचंड असून, केरळमध्ये गुरुवारी दुपारी दाखल झाल्यावर तो वेगाने पुढे निघाला. पुणे वेधशाळेच्या निवृृत्त हवामान विभागप्रमुख कश्यपी यांनी रात्री उशिरा रडारवरील काही छायाचित्रे पाठविली, त्यांच्या अंदाजानुसार, मान्सून तळकोकण (सिंधुदुर्ग) आणि गोव्यात 3 जून रोजीच दाखल होत आहे, तर पुणे शहरात 5 किंवा 6 जून रोजी दाखल होऊ शकतो.

हेही वाचा

Back to top button