पुढारी विशेष : वाहनांच्या ‘स्पीड’चा मरणडोह; कारण बालपणीच्या ‘गेमिंग’ संस्कारात..! | पुढारी

पुढारी विशेष : वाहनांच्या 'स्पीड'चा मरणडोह; कारण बालपणीच्या 'गेमिंग' संस्कारात..!

नाशिक : नील कुलकर्णी

पालकत्व निभवण्यात पालकांच्या होत असलेल्या अक्ष्यम चुका, बालपणापासून वेगवान वाहनांच्या आशयाचे मोबाइल गेम्स खेळल्यामुळे बालवयात अतिवेगाचा झालेला (कु)संस्कार, वाहने वेगाने चालवल्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये येणारी मानसिक, शारीरिक नशा आणि सुखवस्तू कुटुंबात पाल्यांच्या सहज पूर्ण होणाऱ्या गरजा यामुळे किशोरवयीनांकडून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दरवर्षी दुपटीने वाढत आहे, असे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मनोचिकित्सक नोंदवत आहेत.

  • वेगवान वाहन चालवताना मेंदूत स्त्रवतात ॲड्रोनिल, डोपामाईन
  • १८ ते २५ वयोगटातील तरुणाईचे सर्वाधिक अपघात
  • देशात दररोज होतात १ हजार ११३ अपघात

पुण्यातील पौगंडावस्थेतील बिल्डरपुत्राने महागडी मोटार बेभान आणि प्रचंड गतीने चालवून दोन युवा अभियंत्यांचा बळी घेतला. हा केवळ अनावधानाने घडलेला अपघात नव्हताच. त्यामागे तरुणाईचा मनोव्यापार दडलेला आहे. व्यसनाधीनतेसह पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीर आणि मनामध्ये होणाऱ्या मनोव्यापाराचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तज्ज्ञांकडू आलेली कारणे, निष्कर्ष जितकी धक्कादायक आहेत तितकीच नव्या युगातील पालकांना अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला लावणारी आहेत.

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया पहिल्या १०-१२ वर्षांत तयार होतो. पहिले ८ ते १० वर्षे चांगल्या-वाईटाची जाण नसते. याच वयात बालपणी सबकॉन्शिअस माइंडमध्ये काय कोरले गेले, यावर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया अवलंबून असतो. कुठल्याही कौशल्याचा सराव केला तर ती आयुष्यभर लक्षात राहते. नेमके याच वयात मुले मोबाइल गेमिंगच्या व्यसनात अडकतात. पहिल्या ८ ते १० वर्षांत कॉन्शिअस माइंड विकसित नसतील. त्यामुळे सबकॉन्शिअस मनात बालपणी जे बिंबवले जाते तेच आयुष्यभर कॉन्शिअस माइंडमध्ये आयुष्यभरासाठी जतन केले जाते. २००० नंतर जन्माला आलेली पिढी इंटरनेटच्या विकासाच्या आणि स्वस्त मोबाइल डेटाच्या सुगीच्या काळात वाढलेली पिढी आहे. मोबाइलवर फास्ट कार, दुचाकीचे गेम्स, डॅश, खोटे खोटे अपघात, असे सत्याभासी गेम खेळत मोठी झालेली मुले वास्तव जीवनातही वेगवान वाहन चालवण्याचे संस्कार (?) सबकॉन्शिअस माइंडमध्ये जपून ठेवतात. त्यांना गतीचे आकर्षण जडते. ती त्यांची ‘लाइफस्टाइल’च होते. याच कारणांनी १८ ते २५ वयोगटातील तरुणाईकडून सर्वाधिक अपघात घडतात. एकूण घडणाऱ्या अपघांतापैकी अशा युवा वर्गाचे प्रमाण ६७.६ इतके लक्षणीय आहे. यातही गंभीर गोष्ट म्हणजे ‘हिट ॲण्ड रन’ असे अपघात सर्वाधिक प्रमाणात आहे.

पौगंडावस्था वादळी असते. या वयात परिणामांचा विचार न करता कृती होते. वेगवान वाहन चालवताना रक्तदाब, नाडीचे ठोके वाढतात. तत्कालीन क्षणांचा आनंद (सिफटॅटिक नर्व्हस सिस्टममधून) शोधतात. त्याच्या परिणामांचा विचार नसतो. शरीर मनाचा अनियमितता, परिणामांचा विचार न करणे, आव्हाने स्वीकारणे, धोके पत्करणे अशा या वयातील मनोव्यापाराची वैशिष्ट्ये त्यामुळे आवेगाची झिंग येते. म्हणून वेगाने अपघात घडतात. पालकांकडून मुलांना दिले जाणारे स्वातंत्र्य आणि त्याचा मुलांकडून होणारा स्वैराचार याचे हे द्योतक आहे. – डॉ. मृणाल भारद्वाज, किशोरवयीन मुलांच्या अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ.

छोटी होत जाणारी कुटुंबे, एक किंवा दोन आपत्यांना सर्व सुविधा विनासायास मिळतात. त्यामध्ये दोन्ही पालक कामामुळे बाहेर असल्याने पालकत्व निभवण्यास पुरेसा वेळ नसणे, पालकांची वाढलेली क्रयशक्ती आणि घटलेला संवाद, यामुळे पाल्यावर संस्कार घडवण्यासही नव्या पिढीतील पालक कमी पडत असल्याचे निरीक्षण समाजअभ्यासी नोंदवतात. एकूणच पाल्य सुजाण, सुसंस्कृत आणि उत्तम नागरिक व्हावे वाटत असले तर बालपणीचा मूल्य संस्कार, मनाला शांत करणाऱ्या मानवता जोपासणाऱ्या मूल्यांची गरज अधोरेखित होत आहे.

आवेगपूर्ण व्यक्तिमत्त्व हे पौगंडावस्थेतील एक लक्षण. सर्व मनातील रसायनांचा खेळ. तरुणाई वाहने चालवताना वाहनांचा वेग वाढत जातो. ॲड्रिनॅलिन नामक रसायन स्त्रवते आणि अधिक रोमांच व थरार निर्माण करतात. डोपामाईनमुळे उत्तेजना येते आणि उत्साहात आणखीन वेग वाढतो. मग अशा मनःस्थितीत तार्किक विचारशक्ती, निर्णयक्षमता क्षीण होते. अमली पदार्थांचे सेवन केल्याने वागण्यावरील नियंत्रण निघून जाते. असे अनियंत्रित आवेगात्मक व्यक्तिमत्त्व अपघातास कारणीभूत ठरतात. त्यात भर म्हणून अमली पदार्थांच्या नशेत मेंदूतील रिवार्ड सिक्युरिटी सक्रिय होऊन अधिक उत्तेजित करतात. हे दोन्हीही मरणडोहच.! – डॉ. महेश भिरुड, मानसोपचार तज्ज्ञ.

अपघातात ६७.६ टक्के युवकांचा सहभाग

भारत सरकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०२१ या वर्षात ४ लाख १२ हजार ४३२ अपघात झाले. १२.६ टक्क्यांनी अपघात वाढले आहेत. १ लाख ५५ हजार ९२७ अपघातात लोकांचा मृत्यू ओढवला. यातील ५० टक्के अपघात हे अतिवेगवान वाहन चालवल्यामुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरवर्षी अपघातांच्या संख्येत आणि टक्केवारीत दुपटीने वाढ होत आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे एक हजार ११३ अपघात होतात. अपघातात १८ ते २५ वयोगटातील युवावर्गाचे प्रमाण ६७.६ इतके आहे.

बालपणी मुले मोबाइल, संगणकावरील अपघातांचे स्पीड गेमिंग खेळतात. बालपणीचा हाच संस्कार वयात आल्यानंतर कॉन्शिअस मनात ठाम बसतो. वास्तविक जीवनातही ही मुले बालवयात सबकॉन्शिअस माइंडमधील तोच संस्कार वास्तिवक जीवनातही वापरत, वाहनांच्या सुसाट वेगाचे प्रयोग सुरूच ठेवतात. बालपणीच्या स्पीड व्हईकल गेमिंग संस्कारातच युवा वर्गाच्या अपघातांची कारणे लपली आहेत. – सचिन जोशी, शिक्षणतज्ज्ञ.

Back to top button