किर्गिजस्तानमधील भारतीय विद्यार्थी दहशतीच्या सावटात

किर्गिजस्तानमधील भारतीय विद्यार्थी दहशतीच्या सावटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – किर्गिजस्तानमध्ये पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वांशिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी थेट परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवले आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातील तर त्यातही ३५० विद्यार्थी नाशिकमधील आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच किर्गिजस्तान सरकारशी बोलून या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येईल का, याचीही चाचपणी करण्याबाबत त्यांनी पत्रात विनंती केली आहे.

किर्गिजस्तानची राजधानी बिश्केकमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले. त्यानंतर या देशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या १० हजारांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे विद्यार्थी होस्टेलच्या बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. तर अनेकांनी देश सोडून जाण्यासाठी थेट विमानतळ गाठले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांमधील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पत्राद्वारे केली व्यवस्थेची मागणी …

किर्गिजस्तानमध्ये अडकून पडलेल्या आणि हल्ल्याच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना सुखरूप आणायलाहवे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. तांबे यांनी पत्राद्वारे केली आहे.

विद्यार्थीच देशाचे भविष्य!

किर्गिजस्तानमध्ये शिकणारे विद्यार्थी हुशार आहेत. देशाचे भविष्य घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. आता ते अडचणीत आहेत आणि त्यांना परत मायभूमीत आणणे, हे आपले कर्तव्य आहे. यासाठी माझ्या परीने जे करता येईल ते करेल. त्यांचे काही शैक्षणिक नुकसान झाले, तर ते कसे भरून काढता येईल, याबाबतही विचार केला जात आहे. – आमदार सत्यजित तांबे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news