लोकसभा निवडणूक 2024 : वेळेच्या काट्याबरोबर उमेदवारांची धडधडही वाढली..!

लोकसभा निवडणूक 2024 : वेळेच्या काट्याबरोबर उमेदवारांची धडधडही वाढली..!
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे, जातीपातीचे राजकारण, महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ गोडसे यांच्यातील सरळ लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्या निवडणुक रिंगणातील प्रवेशाने वाढलेली चुरस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या प्रचारसभा, रॅलींनी वाढलेली रंगत या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान होत आहे. सलग सुट्यांमुळे मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे आव्हान सर्वच पक्ष, अपक्षांसमोर असल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून राजकीय पक्ष तसेच इच्छुकांची तयारी सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर दुभंगलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने स्वत:ला सावरत नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. मात्र, ऐनवेळी उमेदवारी डावलली गेल्याने नाराज झालेल्या माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या बंडखोरीचे आव्हान ठाकरे गटाला रोखता आले नाही. त्यातच जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटिसा ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे करणाऱ्या ठरल्या. दुसरीकडे नाशिकच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाचा मूळ दावा असताना, भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील हक्क सांगितल्याने महायुतीच्या उमेदवारी निश्चितीला विलंब झाला.

मुख्यमंत्र्यांनी तब्बल चार वेळा नाशिक दौरा करत गोडसेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही साथ गोडसे यांना लाभल्याने त्यांच्या प्रचाराचा रथ पुढे सरकू शकला. नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत होणार असे सांगितले जात असताना, शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा कायम ठेवलेला निर्धार आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीच्या बळावर करण गायकर यांनी उभे केलेले आव्हान यामुळे नाशिकची निवडणूक चौरंगी झाली आहे.

उमेदवारांनी जागून काढली रात्र
शनिवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपुष्टात आल्यानंतर उघड प्रचार बंद झाला असला, तरी कंदील प्रचार अर्थात छुपा प्रचार मात्र सुरूच होता. उमेदवारांचे कार्यकर्ते टार्गेट निश्चित करून विशिष्ट समाज, गटाच्या, लोकांच्या भेटीगाठी घेत होते. मतदार स्लिपा वाटण्याच्या नावाखाली मतदारांच्या घरोघरी जाऊन अमुक उमेदवारालाच मतदान करा, असे संदेश पोहोचविले गेले. प्रचारासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रविवारचा दिवसच नव्हे, तर रात्रही कमी पडली. उमेदवारांनी अक्षरश: रात्र जागून काढत अधिकाधिक मतदान होण्यासाठी देव पाण्यात बुडविले.

जातीय समीकरणांवर विजयाचे गणित
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत. त्यामध्ये सहा लाखांच्या आसपास मराठा, तर साडेपाच लाख ओबीसी मतदार असल्याचा अंदाज आहे. आदिवासी पावणेतीन लाख तर, दलित आणि मुस्लीम समाजातील प्रत्येकी दोन लाख आणि उच्चवर्णीय समाजातील दीड लाखाच्या आसपास मतदार आहेत. चारही प्रमुख उमेदवार हे मराठा समाजातील आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे मतदान विभागले जाणार हे निश्चित आहे. ओबीसी, आदिवासी, दलित-मुस्लीम मते कोणाला मिळतात यावरच या निवडणुकीतील विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यासाठीच महायुतीकडून भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी मते मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी समाजाची अंतस्थ भूमिका यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दलित-मुस्लिमांच्या मतांवर वंचितचा डोळा असला, तरी महाविकास आघाडीकडे या मतांचा कल अधिक असणार हे निश्चित आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news