Weather Update : राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट; विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस | पुढारी

Weather Update : राज्यात 'या' भागात उष्णतेची लाट; विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या झळा अजूनही कायम असून, पुढील तीन दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. विदर्भात मात्र मेघगर्जना, वादळी वारे तसेच अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, तेथे कमाल तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहचला. राज्याच्या उर्वरित भागातही कमाल तापमान 40 अंशांच्या, तर किमान तापमान 18 अंशांच्या पुढे नोंदवले गेले आहे.

राज्याच्या सर्वच भागांत मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात तर उन्हाच्या चटक्याबरोबर रात्रीच्या उकाड्यात जोरदार वाढ झाली. त्यामुळे नागरिक हैराण झाले. एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या टप्प्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेषत: विदर्भात अवकाळी पावसाचे प्रमाण इतर भागांपेक्षा जास्त होते. सध्या विदर्भात अवकाळी पाऊस कायम आहे. तरीदेखील राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद याच भागात होत असल्याचे दिसून आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नगर ,जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, छ. संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर, वाशिम , यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा कमाल तापमानाचा पारा 40 ते 43 अंशांवर पोहचला आहे. तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवस दिवसा प्रचंड उन्हाचा तडाखा, तर रात्री जोरदार उकाडा राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात शुक्रवारी सायंकाळी नोंदविलेले कमाल तापमान

मुंबई-33.2, अलिबाग- 34.7, रत्नागिरी- 33.2, डहाणू- 34.6, पुणे- 39.7, लोहगाव-40.6, नगर- 40.2, जळगाव-41.4, कोल्हापूर- 39.1, महाबळेश्वर- 33, मालेगाव- 42.4, नाशिक -37.9, सांगली- 40.8, सातारा- 40.7, सोलापूर- 42.8, धाराशिव- 41, छ. संभाजीनगर- 38.8, परभणी- 41.4, नांदेड-41.8, बीड-42.6, अकोला- 42.4, अमरावती- 41.4, बुलडाणा- 38.6, ब—ह्मपुरी- 41.9, चंद्रपूर- 43, गोंदिया- 39, नागपूर- 39.9, वाशिम – 41.8, यवतमाळ- 39.7

हेही वाचा

Back to top button