नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चेहडी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात विनापरवाना उभारल्या जात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामास महापालिकेने ब्रेक लावला आहे. मोजणी नकाशा तपासून हद्द निश्चित करण्याचे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने नाशिकच्या उपविभागीय कार्यालयास पाठविले आहे. नगररचना विभागाची परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.
महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी ही माहिती दिली आहे. महापालिका हद्दीत कुठल्याही प्रकारच्या बांधकामास नगररचना विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. शासकीय जागेवरील बांधकामासही हा नियम लागू आहे. परंतु, नाशिक उपविभागीय कार्यालयाने नगररचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता, चेहडी येथील महापालिकेच्या शाळेच्या आवारातच तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकास कुठलीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने काम सुरू केल्याने मुख्याध्यापकाकडून ठेकेदारास विचारणा करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. सदर जागा सरकारी असल्याचा दावा करत उपविभागीय कार्यालयाच्या परवानगीने बांधकाम उभारले जात असल्यामुळे महापालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे उत्तर ठेकेदाराकडून देण्यात आले. यासंदर्भातील तक्रार महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात तपासणी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. ही जागा शासकीय असल्याचा दावा उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने यासंदर्भात जागा मोजणी करून हद्द निश्चित करून घेण्याचे तसेच हद्द निश्चित केल्यानंतर बांधकामासाठी नगररचना विभागाची अधिकृत परवानगी घेण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
महापालिकेच्या शाळेच्या आवारात विनापरवागी तलाठी कार्यालयाचे काम सुरू आहे. या जागेच्या मालकीबाबत वाद निर्माण झाल्याने जागेचा मोजणी नकाशा तपासून हद्द निश्चित करून घेण्याचे तसेच त्यानंतर रीतसर नगररचना विभागाची परवानगी घेतल्यानंतरच बांधकाम उभारण्याचे पत्र उपविभागीय कार्यालयास देण्यात आले आहे. – शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा.
हेही वाचा :