LokSabha Election 2024: धैर्यशील मोहिते-पाटील यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा | पुढारी

LokSabha Election 2024: धैर्यशील मोहिते-पाटील यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी काल (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (LokSabha Election 2024)

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हाती ‘तुतारी’- पवारांनी दिले संकेत

माढा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धैर्यशील मोहिते-पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्याला थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच गुरुवारी उत्तर दिले. येत्या दोन दिवसांत धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. (LokSabha Election 2024)

माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार

पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, मोहिते-पाटील दोन दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र, कोणती अपेक्षा ठेवून ते पक्षात येत नसल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, धैर्यशील मोहिते- पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावर मोहिते-पाटील यांनी प्रतिक्रिया देताना वेट अँड वॉच अशी भूमिका स्पष्ट केली होती. मोहिते-पाटील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. (LokSabha Election 2024)

धैर्यशील मोहिते-पाटील-शरद पवार यांची पुण्यात भेट महत्त्वपूर्ण

माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भाजप श्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा मोठा आग्रह कार्यकर्ते भाजपमध्ये असलेल्या मोहिते-पाटील यांना करत होते. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची घेतलेली भेट ही महत्त्वपूर्ण ठरली.

Back to top button