Ramdas Tadas: भाजप खासदार तडस यांची उमेदवारी PM मोदींनीच रद्द करावी -सुषमा अंधारे

Ramdas Tadas
Ramdas Tadas

नागपूर,पुढारी वृत्तसेवा: भाजपचे वर्धा येथील खासदार आणि या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच रद्द करावी; अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज (दि.११) पत्रकार परिषदेत केली. रामदास तडस यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेली त्यांची सून पूजा तडस यांच्यावरील अन्यायाचा संदर्भ देत त्यांनी ही मागणी केली आहे. (Ramdas Tadas)

आपल्याला 17 महिन्यांचे बाळ असताना पती पंकज तडस यांना घरी ठेवून घेत आपल्याला घराबाहेर काढले, खोटे लग्न लावले, एका फ्लॅटवर ठेवले, अनन्वित अत्याचार केले, असा आरोप पूजा तडस यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज हा मुद्दा माध्यमातून चर्चेत आहे. येत्या 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात येत असल्याची चर्चा असल्याने या आरोप-प्रत्यारोपाना जोर आला आहे. (Ramdas Tadas)

मोदींजींच्या परिवारातील हा प्रकार बरोबर नाही, परिवारप्रमुख म्हणून आपण हे काम करावे असेही अंधारे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, हे सर्व निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांचे आपल्याविरोधातील षडयंत्र आहे. आपल्या मुलाला फसवत त्याच्या हत्येचा डाव रचला, या विषयीची ऑडीओ क्लिप असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही खासदार तडस म्हणाले. विकासाच्या बाबतीत मुद्दे नसल्याने विरोधक तिला हाताशी धरत आपल्याला खंडणी मागत आहेत. असेही भाजपचे वर्धा येथील आगामी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.  (Ramdas Tadas)

हनी ट्रपचे आरोप तडस कुटुंबिय करीत असून, सातत्याने पूजा तडसवर अन्याय करत आहेत. त्यानंतरही भाजपने त्यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली. या कुटुंबाची सून व पीडित पूजा तडस मोदी परिवारात नाही काय?, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. दरम्यान,चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे आक्षेपार्ह विधान लक्षात घेता निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणीही ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news