Shiv Sena (UBT) leader| ठाकरेंचा उमेदवार अडचणीत; अमोल कीर्तिकरांची ८ एप्रिल रोजी ED कडून चौकशी | पुढारी

Shiv Sena (UBT) leader| ठाकरेंचा उमेदवार अडचणीत; अमोल कीर्तिकरांची ८ एप्रिल रोजी ED कडून चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क: कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना बुधवारी समन्स बजावले होते. यानुसार कीर्तिकर यांना ईडीने सोमवार ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे, या संदर्भातील वृत्त आज (दि.२९) ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Shiv Sena (UBT) leader)

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेदवाऱ्यांच्या याद्या देखील जाहीर झाल्या आहेत. दरम्यान काही उमेदवारांकडून लोकसभा निवडणुक प्रचारालाही सुरूवात करण्यात आली आहे. ठाकरे गटातून अमोल कीर्तिकर यांनाही मुंबई- वायव्य येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. याच दरम्यान त्यांना ईडीचे समन्स आले आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Shiv Sena (UBT) leader)

Amol Kirtikar: जे केजरीवालांसोबत तेच राज्यातील नेत्यांसोबत होतंय

ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे दिल्लीत केजरीवाल यांच्याबाबतीत झाले तेच महाराष्ट्रातील नेत्यांच्याबाबत होत आहे. अमोल कीर्तिकर हेच मुंबई- वायव्य येथून ठाकरे गटाचे उमेदवार असतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (Shiv Sena (UBT) leader)

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. (Khichdi scam)

यापूर्वी बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ठाकरेंच्या नेत्यांची चौकशी

खिचडी घोटाळाप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर, ठाकरे सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची चाैकशी केली आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी झाली आहे. आता खिचडी घोटाळ्यामुळे ठाकरे गटातील काही नेते अडचणीत आले आहेत. आता अमोल कीर्तिकरांची ईडी चौकशी करत आहे.

हे ही वाचा:

 

Back to top button