सावध व्हा! वाहतूक नियम, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू | पुढारी

सावध व्हा! वाहतूक नियम, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मौजमस्ती करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातल्याची घटना गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडली. वाहतूक नियम व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने झालेल्या कार अपघातात एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर एक तरुण व तरुणी जखमी झाले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिद्धी प्रशांत गुजराती (१८, रा. खोडेनगर, हिरावाडी) आणि नीरज रवींद्र धारणकर (१८, रा. काठे गल्ली) या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आर्यन फडकर आणि पाठीमागे बसलेली मृण्मयी अहिरे हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारदान फाटा येथून मंगळवारी (दि.२६) रात्री पावणेआठच्या सुमारास नाशिककडे चौघेही विद्यार्थी कार (एमएच १२ एनबी १४५८) मधून येत होते. चालक भरधाव कार चालवत होता. त्यातच कारचे टायर फुटल्याने कार पलट्या खात रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

..तर पालकांविरोधात दाखल होणार गुन्हा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही विद्यार्थ्यांचे शालेय दाखले तपासले जाणार आहेत. त्यात कारचालक अल्पवयीन आढळून आल्यास त्याच्यासह पालकांविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच कारचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना होता की नाही याचीही चौकशी पोलिस करीत आहेत.

कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
पोलिसांच्या तपासानुसार, काही दिवसांपूर्वी बारावीची परीक्षा संपल्याने चारही मित्रांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. त्यानुसार आर्यनने त्याच्या काकाची कार आणली. या कारमध्ये चौघे मित्र-मैत्रिणी गंगापूर बॅकवॉटर परिसरात फिरायला गेले. तेथून नाशिककडे परतताना आर्यनने कारचा वेग वाढवला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

..तर चित्र वेगळे असते
पोलिसांच्या तपासानुसार वाहनाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. कार ५-६ फूट उंच उडाल्यानंतर कार आदळून टायर फुटले. चौघांनीही वाहनात सीटबेल्ट लावले नव्हते. त्यामुळे अपघातानंतर एअरबॅग उघडल्या नाहीत. वेगावर नियंत्रण व सीटबेल्टचा वापर केला असता तर अपघाताचे चित्र वेगळे राहिले असते, अशी चर्चा घटनास्थळी होती.

‘त्या’ घटनेची आठवण ताजी
सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२२ रोजी मोहदरी घाटात झालेल्या तिहेरी कार अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी अपघातग्रस्त कार अल्पवयीन विद्यार्थी चालवित असल्याचे उघड झाले. विद्यार्थ्याने मामाकडील कार आणून महाविद्यालयीन मित्रांसाेबत एका कार्यक्रमास गेला होता. तेथून नाशिकला परतताना हा अपघात झाला होता.

हेही वाचा:

Back to top button