Amit Shah : मोदींची गॅरंटी देण्यासाठी आलो आहे

जळगाव : येथील जाहीर सभेत उपस्थितांना अभिवादन करताना अमित शहा. समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आदी. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव : येथील जाहीर सभेत उपस्थितांना अभिवादन करताना अमित शहा. समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आदी. (छाया : नरेंद्र पाटील)

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या तीनचाकी रिक्षाची तिन्ही चाके पंक्चर झाली असून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करत आहे. भाजपकडे 10 वर्षांचा अनुभव आणि पुढील 25 वर्षांचे व्हिजन असल्याचे सांगतानाच जनता 50 वर्षांपासून पवारांना सहन करत असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली. मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या वेळी सत्ता द्या, भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर झेप घेईल, असाही दावा त्यांनी केला.जळगाव येथे भारतीय जनता पक्षातर्फे युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

युवकांशी संवाद साधताना शहा यांनी आपल्या संवादाची सुरुवात 'जय जय शिवराय' यांच्या घोषणांनी केली. माझ्या जिगरचे तुकडे, तुम्हा सर्व युवकांचे मी स्वागत करतो, अशा शब्दसुमनाने त्यांनी युवकांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर व देश ज्यांच्या उपकाराची कधीच परतफेड करू शकत नाही, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करतो. ही निवडणूक युवकांची आहे. भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी केलेले मतदान आहे, हा मुद्दा त्यांनी युवकांच्या मनावर ठसवला.

2024 च्या निवडणुकीसाठी आम्ही आपल्यासमोर आलेलो असलो तरी ही निवडणूक भारताच्या भविष्याची निवडणूक आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे युवक पक्षासाठी नव्हे, तर देशासाठी मतदान करणार आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युवा संवादामध्ये बोलताना केले.

परिवार वादावर हल्लाबोल
मोदींच्या विरोधात असलेला पक्ष परिवारवादी आहे. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांना राहुल गांधीला पंतप्रधान बनवायचे आहे. उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवू पाहत आहे. शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्यासाठी कोणी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत तुमच्या व आपल्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असे सांगितले.

पाकला करारा जबाब
पूर्वी दररोज आपल्या सीमेवर अतिरेकी हल्ले व्हायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहा दिवसांत पाकला करारा जबाब देऊन भारत पलटवार करू शकतो, याची जाणीव करून दिली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. कलम 370 हटवण्यासाठी काँग्रेस सरकारने 70 वर्षे काहीही केले नाही. 370 कलम हटविल्यानंतर रक्ताची नदी वाहतील, अशी भीती काँग्रेसवाले दाखवायचे, आता त्या ठिकाणी दगडही उचलणे अवघड झालेले आहे, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. या सरकारच्या काळात फार क्षेत्रामध्ये युवकांसाठी दरवाजे उघडण्यात आले. आपण आपला नेता किंवा आपला देशाचा पंतप्रधान निवडताना त्याचा बायोडाटा जरूर पाहावा, असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

फक्त पाच वर्षांचा हिशोब द्या
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले की, देशाची जनता नरेंद्र मोदींना दहा वर्षांपासून पाहतोय, तर महाराष्ट्राची जनता पन्नास वर्षांपासून सहन करत आहे. पन्नास वर्षांचा हिशोब सोडा फक्त पाच वर्षांचा हिशोब द्या, असा प्रश्न त्यांनी शरद पवारांना केला. काँग्रेस सरकारने फक्त आपल्यावर फायद्यासाठी सर्वांना दाबून ठेवले होते. जे राम मंदिर सत्तर वर्षांत व्हायला पाहिजे होते ते नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केले. काशी विश्वनाथ कॉरिडोर तोही नरेंद्र मोदींनी केला, याकडे त्यांनी युवकांचे लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news