Nashik | शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदीने वाचा फोडा – नाना पाटेकर

नाशिक : सह्याद्री फार्म्स येथे आयोजित अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना नाना पाटेकर, रामचंद्र पाटील, पुष्पराज गावंडे, सरोज काशीकर, ॲड. नितीन ठाकरे, विलास शिंदे, गंगाधर मुटे, ॲड. सतीश बोरुळकर.
नाशिक : सह्याद्री फार्म्स येथे आयोजित अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना नाना पाटेकर, रामचंद्र पाटील, पुष्पराज गावंडे, सरोज काशीकर, ॲड. नितीन ठाकरे, विलास शिंदे, गंगाधर मुटे, ॲड. सतीश बोरुळकर.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या 'नटसम्राट'मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरू नये तर फक्त जगावं. केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर जिद्दीने चांगले दिवस आणावे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील रहावे.

सह्याद्री फार्म्स येथे सोमवार (दि.४)पासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, माजी आमदार सरोज काशीकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाधर मुटे, संमेलनाचे संयोजक ॲड. सतीश बोरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटेकर पुढे म्हणाले, सोन्याचा भाव वाढतो. मात्र रोजच्या जगण्यासाठी अनमोल असणाऱ्या आमच्या गहू, तांदळाचा भाव का वाढत नाही? हाही प्रश्‍न मला पडतो. देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकार मात्र दुर्लक्ष करते ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी आता अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नये. शेतकरी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला नाम फाउंडेशनकडून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, शरद जोशी यांनी मांडलेल्या चतुरंग शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यावर सह्याद्री फार्म्समार्फत प्रयत्न केला आहे. शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळवणारे आहे. संमेलनाध्यक्ष भानू काळे म्हणाले की, साहित्य म्हणजे फक्त ललित साहित्य अशा मर्यादित अर्थाने साहित्याकडे पाहिले जाते. विचारप्रधान साहित्य हा साहित्याचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या साहित्याकडेही सन्मानाने पाहिले पाहिजे. काळे यांनी शरद जोशी यांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news