NMC Nashik | महापालिकेचा ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर

NMC Nashik | महापालिकेचा ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. या आकृतिबंधाला शासनाची मंजुरी मिळाल्यास महापालिकेतील जम्बो नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

१९९६ मध्ये महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या पहिल्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाली होती. त्यावेळी महापालिकेचा समावेश 'क' वर्गात होता. कालांतराने शहराचा विस्तार वाढला. लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधांची महापालिकेवरील जबाबदारी वाढली. मात्र दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांची संख्या मात्र ३,३१४ वर गेली. महापालिकेची 'क' वर्गातून 'ब' वर्गात पदोन्नती झाली. मात्र कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित ६२५ नवीन पदांना मंजुरी दिली. त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या ७,७१७ वर पोहोचली. दरम्यान, २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. परंतु शासनाने तो अव्यवहार्य ठरविला. त्यानंतर सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देताना सुधारित आकृतिबंध तातडीने सादर करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने महापालिकेतील ४९ विभागांना आवश्यक पदे, व्यपगत होणारी पदे, मंजूर पदे, कालबाहय ठरलेली पदे असा अनुक्रम देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व विभागांकडून प्राप्त माहिती आधारे ९,०१६ पदांचा एकत्रित प्रस्ताव प्रशासनातर्फे गुरुवारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असून, तो आता शासनाच्या पुढील मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

वर्ग                      सध्याची मंजूर पदसंख्या       नवी पदनिर्मिती       निरसित पदसंख्या        एकूण नवीन पदसंख्या
अ                                  २३३                                २११                          ०                           ४४४
ब                                   १५३                                 ८३                         २                            २३४
क                                  २४८९                            १२६५                       ९९                           ३६५५
ड                                  २८५७                            ३९४                       ५६१                           २६९०
सफाई कर्मचारी               १९९३                                ०                           ०                             १९५३
एकूण                            ७७२५                          १९५३                     ६६२                           ९०१६

सफाई कर्मचाऱ्यांची पदसंख्या जैसे थे!
१९९६ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधात सफाई कर्मचाऱ्यांच्या १,९९३ पदांना मंजुरी देण्यात आली होती. गेल्या २७ वर्षांत नाशिकची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किमान पाच हजार असायला हवी. त्यामुळेच महापालिकेने सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे एकही पद सुधारित आकृतिबंधात वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका सफाई कामाचे आउटसोर्सिंग करणार हे स्पष्ट होत आहे.

मुख्य अभियंतापदाची निर्मिती
सुधारित आकृतिबंधात १,९५३ पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. महापालिकेत शहर अभियंता हे पद तांत्रिक संवर्गातील सर्वोच्च पद होते. आता मुख्य अभियंतापदाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय घनकचरा संचालक, सहायक संचालक घनकचरा, महापालिका रुग्णालयांसाठी हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरो फिजिशियन, न्यूरो सर्जन, गॅस्ट्रो तज्ज्ञ, किडनीरोग तज्ज्ञ, फिजिओलॉजिस्ट, शरीरशास्त्र तज्ज्ञ, औषध वैदिकशास्त्र तज्ज्ञ, इपीडे लॉजिस्ट, ज्ञान वैदिक तज्ज्ञ प्रत्येकी एक तर कॅन्सर सर्जन, कॅन्सर फिजिशियन प्रत्येकी दोन, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी १९, नेत्र सहाय्यक ५, दंत सहाय्यक ५, फिजिओथेरपिस्ट २, एमएस्सी मायक्रो बायोलॉजिस्ट १०, एमआरआय तज्ञ ६, सिटी स्कॅन तज्ञ ६, इसीजी तज्ञ ३, केमिस्ट २,समुपेदशक ५, पर्यावरण विभागासाठी उपअभियंता पर्यावरण १, बायोमेडिकल इंजिनअर १, जीआयएस एक्सपर्ट १, जीआयएस आॉपरेटर ४, सहाय्यक कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) २०, पशु पर्यवेक्षक ७, बायोमेडिकल सहायक २, मलेरिया विभागासाठी हिवताप पर्यवेक्षक ६, किटक संहारक १, गोठा कोंडवाडा परिचर १ या पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.

ही पदं केली रद्द
प्रशासन अधिकारी श्रेणी अ १, शहर विकास अधिकारी १, प्रशासन अधिकारी श्रेणी ब १, लघुलेखक निम्नश्रेणी ३, सहायक अधीक्षक २४, टेलिफोन आॉपरेटर २, संगणक आॅपरेटर ७, उभारक १, वेल्डर २, फिल्टर अटेंडन्ट १, फोरमन २, विभागीय स्वच्छता निरीक्षक २८ पैकी १२, प्रोजेक्टनिस्ट १, खतप्रकल्पावरील इलेक्ट्रिशियन ४, वेल्डर २,. ऑटो इलेक्ट्रिशियन २, स्टोअरकिपर २, डेटा इन्ट्री ऑपरेटर २, पोकलेन आॉपरेटर ८, ट्रक वाहनचालक १४, चारचाकी वाहनचालक ६, ऑटो मेकॅनिक २, हॅड्रोलिक मेकॅनिक २, कामाठीची सर्व ९९ पदे, पेन्टर ६, सुतार ८, गवंडी १०, झेराॅक्स मशीन चालक १, ऑइलमन ३, पंपचालक १, बोअर अटेंडन्ट २२, केमिकल मजदूर २४, लॅब अटेंडन्ट २१२, वॉचमन ११६, गंगापट्टेवाले १०, मजूर ३०, अशी ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news