नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नासिक सिटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली असून सिटीलिंकच्या वाहकांनी पुन्हा संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यापासून कंडक्टर कर्मचाऱ्यांचे पगार तसेच बोनस देखील दोन वर्षापासून जमा झालेला नसल्या कारणामुळे सिटी लिंकच्या कंडक्टर यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे.
सिटीलिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा बंद आहे. तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होतायेत. वाहकांचे तीन महिन्यांचे पगार रखडले आहेत. तसेच अनेकांना तर साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. येथील कर्मचाऱ्यांना बससेवा बाबतचे नियम मोडल्यास दंडही आकारला जात असल्याचा आरोप वाहकांनी केला आहे. सिटीलिंक कर्मचारी याबाबत वारंवार प्रशासनाकडे समस्यांचा पाढा वाचत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या समस्यांवर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने हा संप मिटणार तरी कधी? असा प्रश्न आता वारंवार उपस्थित होतो आहे. परीणामी बससेवा विस्कळीत होऊन प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.