Lal Vadal : बैठक निष्फळ; लाल वादळाचा मुक्काम वाढणार | पुढारी

Lal Vadal : बैठक निष्फळ; लाल वादळाचा मुक्काम वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील स्मार्ट रोडवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. २७) मुंबईत महसूल मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांचा मुक्काम वाढणार आहे. हा मुक्काम अजून किती दिवस वाढेल याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.

जवळपास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी मोर्चाद्वारे सोमवारी (दि. २६) दुपारी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयासमोरील स्मार्ट रोडवर या आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समितीने आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी (दि. २७) मुंबईत मंत्रालयात बोलावली होती.

बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळीच बैठकीकरिता हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. दुपारी १.३० वाजता ही बैठक होणार होती. परंतु विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बैठकीला विलंब झाला होता. सायंकाळी 6.30 ला सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. मात्र या बैठकीत शासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन हे सुरुच राहणार असल्याचे जे.पी. गावित यांनी सांगितले.

मुंबई आज झालेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन सुरुच राहणार आहे. बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. – जे. पी. गावित, माजी आमदार.

 

नाशिक : विविध मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन दिवसांपासून धडकले आहे. मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यान या आंदोलकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यावरच ठाण मांडले आहे. त्यामुळे ‘नाशिकच्या स्मार्ट रोडवर’ चूल मांडून आंदोलक आपली भूक भागवत आहेत. तर दिवसा उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून थेट मेहेर सिग्नलपर्यंत जाळी टाकून आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे आंदोलकांचा अनिश्चिततेचा मुक्काम वाढला असल्याचे दिसून येते.. पहा फोटो… (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

Back to top button