Sinner Bazar Samiti Election Result | कोकाटेताई ‘नॉट रिचेबल’ होताच गाडे ‘कव्हरेज’ क्षेत्रात | पुढारी

Sinner Bazar Samiti Election Result | कोकाटेताई 'नॉट रिचेबल' होताच गाडे 'कव्हरेज' क्षेत्रात

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर

आठ-नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या सिन्नर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे-युवा नेते उदय सांगळे यांच्या गटांना ९-९ अशा समसमान जागा मिळाल्या होत्या. आणि तेव्हापासूनच बाजार समितीच्या खळ्यावरून नाट्यमय घडामोडींचे वारे वेगाने वाहू लागले होते राजकीय गरमागरमीचे ‘ते’ वातावरण या निवडणुकीतही कायम राहिले. सभापतिपदाची आस धरून सिंधुताई कोकाटे निवडणुकीआधी दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ झाल्या. त्याचवेळी सावध झालेल्या वाजे- सांगळे गटाने शशिकांत गाडे यांच्याशी संपर्क साधला. ते ‘कव्हरेज क्षेत्रात’ आले आणि सभापतिपदी विराजमानही झाले, अशी चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे. आठ नऊ महिन्यांपूर्वी प्रचंड महत्त्वाकांक्षेपायी सिंधुताई केशव कोकाटे यांनी आमदार कोकाटे यांचा गट सोडून वाजे सांगळे यांच्या तंबूत दाखल झाल्या होत्या, त्यावेळी त्यांना उपसभापतिपद मिळाले. मात्र यावेळीही त्यांच्या महत्त्वाकांक्षेला सभापतिपदाचे घुमारे फुटल्याची चर्चा झडली वाजे सांगळे यांचा आठ संचालकांचा गट सहलीवर गेला होता मात्र कोकाटेंताई पती केशवराव यांच्यासह वेगळ्या वाटेवर होत्या, असे सांगितले जाते. राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्या नॉट रिचेबल होत्या त्यानतर या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्याची चर्चा आहे गाडे आले मात्र सोबत नवनाथ नेहे या संचालकांनाही आणले. त्यामुळे वाजे सांगळे गटाचे बहुमत झाले.

कोकाटेंची ‘परवड’
दोन्ही गटांकडे ८-८ संचालक असल्यामुळे आपण किंगमेकर असल्याची उपसभापती सिंधुताई कोकाटे यांच्यासह पती केशव कोकाटे यांची भावना बळावली होती. मात्र वाजे यांनी दोन संचालकांना फोडल्यामुळे कोकाटेताईंचे महत्त्व आपसूक कमी झाले. त्यांची ‘परवड’ झाल्याची चर्चा आहे.

वाजेंचे पर्याय खुंटले होते : आमदार कोकाटे
सभापती पदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे सर्व पर्याय खुंटले होते. त्यामुळे त्यांनी आमच्या समर्थकाला ऑफर करून सभापतिपदी विराजमान केले, असा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. सिंधुताई केशव कोकाटे त्यांच्या गटातून बाहेर पडल्यामुळे पेच निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाजेंना आमच्या संचालकाला सभापती करणे हा एकमेव पर्याय उरला होता, असेही त्यांनी अधोरेखित केले.

काही महिन्यांपूर्वी बाजार समितीची संचालक मंडळाची अटीतटीची निवडणूक झाली होती. दोन्ही गटांचे समसमान ९ संचालक निवडून आले होते. चांगल्या भावनेतून मी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे अडीच-अडीच वर्षे सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्याऐवजी आमच्या गटातील सिंधुताई कोकाटे यांना सभापतिपदाचा शब्द देऊन गळाला लावले. सभापती आपला होत असेल, तर तिकडे जाण्यास हरकत नाही, असे मी सांगितले होते. परंतु तिकडे गेल्यावर त्यांची फसवणूक झाली. सभापतिऐवजी उपसभापतिपद देण्यात आल्याने त्यांचाही गोंधळ झाला. आमचे ८ आणि त्यांचे ९ सदस्य होते. सिंधूताई कोकाटे त्यांच्याकडून बाहेर पडल्याने वाजे यांचे पर्याय खुंटले होते. मी अगोदरच शशी गाडे यांना वाजेंचा सभापतिपदासाठी प्रस्ताव आल्यास तो स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार गाडेंनी तो स्वीकारला. दुसरे संचालक नेहे हे सुद्धा मला विचारून त्यांच्याबरोबर गेले, असाही दावा आमदार कोकाटे यांनी केला आहे.

Back to top button