पुढारी विशेष : द्राक्ष निर्यातीला लागतोय दुप्पट वेळ; तिप्पट भाडे | पुढारी

पुढारी विशेष : द्राक्ष निर्यातीला लागतोय दुप्पट वेळ; तिप्पट भाडे

नाशिक : अमित यादव

तांबड्या समुद्रात हुती बंडखोर मालवाहू जहाजांवर करत असलेल्या हल्ल्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातदारांना चांगलाच फटका बसला आहे. पूर्वीपासून युरोपसाठी होणारी द्राक्षांची निर्यात सुएझ कॅनॉलमार्गे होत असे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या समुद्री चाच्यांमुळे मालवाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्यांनी सुरक्षिततेचा मार्ग म्हणून आता संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून, ‘केप ऑफ गुड होप’मार्गे युरोप हा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातीसाठी दुपटीने वेळ व तिपटीपेक्षा अधिक भाडे वाढल्याने निर्यातदार चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहे.

गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी असो अथवा निर्यातदार यांना कधी अवकाळी, सरकारचे धोरण असो अथवा युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम यांचा फटका बसला. मात्र आता येमन देशातील हुती बंडखोरांनी इस्रायल-गाझा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझावर जगाचे लक्ष केंद्रित व्हावे व पूर्वीचा पॅलेस्टाइन अस्तित्वात यावा यासाठी सुएझ कॅनॉलमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवर ड्रोनने हल्ले चढवले आहे. त्यामुळे शेतमाल एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांसह मालवाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या महिन्यात अनेक जहाजांना या हुती बंडखोरांनी लक्ष्य केल्याने मोठे नुकसान झाले आहे.

– युरोपला पूर्वी निर्यातीसाठी लागणारा वेळ : २१ दिवस
– केप ऑफ गुड होपमार्गे आता लागणार वेळ : ३५ ते ४० दिवस
– पूर्वी एका कंटेनरला साधारण येणार खर्च : १५०० डॉलर
– केप ऑफ गुड होपमार्गे आता येणारा खर्च : ४७०० ते ४८०० डॉलर
– गेल्या आठवड्यात ११९० कंटेनरची युरोपला निर्यात
– नेदरलँड, जर्मनी, युके, फ्रान्स या देशांना १०२७ कंटेनरची निर्यात

निर्यातीच्या मालाची गुणवत्ता ढासळली
युरोपीय निकष पूर्ण करत तेथील स्थानिक बाजारपेठेत माल विकणे एक मोठे आव्हान असते. त्यातच आता युरोपला निर्यात होणाऱ्या द्राक्षांचा निर्यात कालावधी साधारण १५ दिवसांपेक्षा अधिक वाढल्याने द्राक्षांची गुणवत्तादेखील ढासळत आहे. द्राक्षांना प्रिझर्व्ह करून ठेवणे अजून अवघड बनले आहे.

जिल्ह्यात यंदा ५८ हजार हेक्टर लागवड
नाशिक जिल्ह्यात यंदा अवकाळीसह विविध संकटांचा सामना द्राक्ष बागायतदारांना करावा लागला आहे. जिल्ह्यात ५८ हजार ४१८ हेक्टर द्राक्षबागेची लागवड झाली असून, त्यातील २३ हजार १७१ हेक्टर लागवड ही एकट्या निफाड तालुक्यात झालेली आहे.

काॅर्गो जहाजांचे दरही भडकले
गेल्या दोन महिन्यांत भारतातून युरोपला जाणाऱ्या मालवाहू जहाजांचे दरदेखील भडकले आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांनी एका विशिष्ट दरात युरोपमधील कंपनीशी केलेला करार आता मालवाहतुकीत झालेल्या वाढीने निर्यातदारांना चांगलेच आर्थिक संकटात आेढले आहे.

भारतासाठी महत्त्वाचा तांबडा समुद्र
भारताच्या एकूण निर्यातीपैकी 50 टक्के तर, आयातीपैकी 30 टक्के वाहतूक समुद्रामार्गे होते. भारतातील कंपन्या युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या देशांशी व्यापार करण्यासाठी सुएझ कालव्याद्वारे लाल समुद्राचा मार्ग वापरतात. गेल्या आर्थिक वर्षात १८ लाख कोटी रुपयांच्या देशाच्या निर्यातीपैकी ५० टक्के आणि १७ लाख कोटी रुपयांच्या आयातीपैकी ३० टक्के या मार्गाचा वाटा आहे.

सुएझ कॅनॉलमार्गे होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबलेली असून, याचा मोठा आर्थिक फटका हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच उत्पादित माल युरोपला पोहोचण्यासाठी वेळ लागत असल्याने तेथील बाजारात स्थान मिळवणेदेखील अवघड झाले आहे. – अमित चोपडे, चोपडे फार्मस ॲण्ड एक्स्पोर्टस लोणवाडी.

Back to top button