पुढारी विशेष : उद्योगमंत्र्यांच्या नव्या घोषणेने संभ्रम : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, उद्योजकांचा सूर | पुढारी

पुढारी विशेष : उद्योगमंत्र्यांच्या नव्या घोषणेने संभ्रम : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, उद्योजकांचा सूर

नाशिक : सतीश डोंगरे

२०१८ मध्ये केंद्र सरकारने कोईमतूरसह नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमआयडीसीला पत्र पाठवून नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला होता. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी राज्यातील नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबादमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारच्या या सर्व घोषणा हवेतच विरल्या असून, डिफेन्स क्लस्टरमधून नाशिकचा पत्ता कट करण्यात आल्याचे उद्योगमंत्र्यांच्या नव्या घोषणेवरून स्पष्ट होत आहे. (Defense Innovation Hub)

उद्योग मंत्रालयातर्फे पुणे, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या (MSME Defense Expo) उद्घाटन समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत डिफेन्स हब व डिफेन्स क्लस्टरशी संबंधित ज्या-ज्या घोषणा केल्या गेल्या, त्यामध्ये नाशिकला प्राधान्याने स्थान दिले गेले. मात्र, उद्योगमंत्र्यांनी डिफेन्स क्लस्टरमधून नाशिकचे नाव वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९६५ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना घेतले गेले होते. नाशिककरांनी त्यांना लोकसभेवर अविरोध निवडून दिले होते. याची परतफेड म्हणून त्यांनी नाशिकला ‘एचएएल’चा प्रकल्प भेट दिला. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा काही भाग असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ उभारणार असल्याची घोषणा करीत, नाशिकला पुन्हा देशपातळीवर महत्त्व प्राप्त करून दिले. त्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल त्वरित सादर करावा,असे आदेश एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयास दिले होते. या अभ्यास अहवालावर काम करताना क्लस्टरसाठी अक्राळे (दिंडोरी), चिचोंडी (येवला), विंचूर पार्क (निफाड), सायने (मालेगाव), माळेगाव (सिन्नर) या भागांत जागेची चाचपणीदेखील केली होती.

त्यानंतर जेव्हा-जेव्हा डिफेन्स इनोव्हेशन हब (Defense Innovation Hub) वा क्लस्टरशी संबंधित घोषणा केल्या गेल्या, त्यामध्ये नाशिकला प्राधान्य दिले गेले. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांच्या नव्या घोषणेमुळे नाशिकला यातून डावलल्याचे दिसून येत आहे. स्थानिक राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नाशिकचे नाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून वगळले गेल्याचा आरोप उद्योग क्षेत्रातून केला जात आहे.

दीडशे कोटींचा निधी
डिफेन्स क्लस्टरसोबतच डिफेन्स इनोव्हेशन हबच्या (Defense Innovation Hub) निर्मितीसाठी ‘डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’ च्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले होते. २०१८ मध्ये नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधींसंदर्भातील चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. भामरे यांनी ऑर्गनायझेशनसाठी एचएएलने १००, तर बीईएलने ५० कोटींचा निधी उभारला असल्याचे सांगितले होते.

मुंबई, पुणे, नाशिक श्रृंखला खंडित
डिफेन्स क्लस्टर आणि इनोव्हेशन हबमुळे (Defense Innovation Hub) संरक्षण व उत्पादन क्षेत्राशी निगडित असलेल्या मुंबई आणि पुण्याच्या शृंखलेत नाशिक जोडले जाणार होते. डिफेन्स क्लस्टरमुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे बोलले जात होते. संरक्षण क्षेत्रासाठी देशभरात कार्यरत असलेल्या इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरची एक शृंखला कार्यरत असून, या क्लस्टर आणि हबमुळे या शृंखलेत नाशिक जोडले जाणार असल्याच्या घोषणा केल्या गेल्या होत्या. मात्र, उद्योगमंत्र्यांच्या घोषणामुळे ही श्रृंखलाच खंडित झाल्याची उद्योग क्षेत्रात चर्चा आहे.

आधीच्या डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस पाॅलिसीमध्ये पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर व अहमदनगर या पाच शहरांचा समावेश होता. नेमका यावेळी हा उल्लेख का नाही, याची आग्रहपूर्वक मागणी करणार आहे. खरं तर आमदारांनी याकामी पुढाकार घेतला तर बरं होईल. केंद्रातून मंजूर झालेल्या डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे काम जोरात सुरू असल्याने क्लस्टरसाठी नाशिकचाही विचार व्हायलाच हवा. – प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ता, भाजप.

Back to top button