Nashik | दोन हॉटेल्सचे मद्यविक्री परवाने १५ दिवसांसाठी निलंबित | पुढारी

Nashik | दोन हॉटेल्सचे मद्यविक्री परवाने १५ दिवसांसाठी निलंबित

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
मद्यविक्री नियमावलींचे पालन न करणाऱ्या, तसेच मद्यविक्रीबाबतचे रेकॉर्ड सादर करू न शकणाऱ्या हॉटेलचालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला. ओझर शिवारातील दहावा मैल येथील दोन हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग काम करतो. या विभागाच्या निरीक्षकांच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडून दहावा मैल परिसरातील ‘हॉटेल द किकर’ आणि अभिज रेस्टो बारची पाहणी करण्यात आली. त्यावेळी या पथकांना अनेक त्रुटी आढळून आल्या. संबंधित परवानाधारक एफएलआर-३ एफएलआर-३ नोंदवह्या निरीक्षणकामी सादर करू शकल्या नाहीत. याशिवाय उपस्थित व्यक्तींचे नोकरनामेदेखील सादर केले नाहीत. तसेच कॅश मेमो व शेरेपुस्तिका सादर करण्यात आल्या नाहीत. संबंधित दोन्ही हॉटेलच्या मंजूर नकाशात मद्यविक्री ही परमिटअंतर्गत असताना म. रेस्टॉरंटमध्ये काउंटर लावून सीलबंद बाटलीतून मद्यविक्री होत असल्याचे तसेच किचन रेस्टॉरंटदेखील कार्यान्वित नसल्याचे आढळले. हॉटेलच्या दर्शनी भागात परवान्याचा माहितीफलक लावला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला आढळून आले. दोन्ही हॉटेल्सचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.

दोन्ही हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असून, ओझर नगर परिषद व ओझर पोलिस ठाण्याचा नकारात्मक अहवाल आहे. -रावसाहेब शिंदे, स्थानिक रहिवासी, ओझर.

Back to top button