Goda Mahaarti | रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे गोदाआरती | पुढारी

Goda Mahaarti | रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे गोदाआरती

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा महाआरतीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) झाला. दुतोंड्या मारूती, गंगाघाट येथे सकाळी विविध ज्ञांतीच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती संपन्न झाली.

जगद्गुरु श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य डॉ. सुमंताश्रम महाराज (स्वामी सखा), इस्कॉनचे ब्रह्माचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, जागृत भारत अभियानाचे स्वामी कंठानंद, आचार्य गोस्वामी १०८ गोपीनाथ दीक्षित, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचवटी : रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे महाआरती महाआरती करतांना साधू महंत. (छाया: रुद्र फोटो)

स्वामी सखा सुमंत यांनी या गौतम ऋषींच्या आशिर्वादाने गोदा महाआरतीचे ढोल वादन व शंख ध्वनीला सुरवात होत असल्याचे सांगितले. दादा वेदक यांनी महाआरतीचा कठोर संकल्प समितीने केला आहे. यातून समाज एकसंघ झाला पाहिजे असे लक्ष्य समितीने ठेवले पाहिजे, असे सांगितले.

अध्यक्ष जयंत गायधनी म्हणाले, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना आज यश प्राप्त होत आहे. पंच महाभूतांमधील एक असलेल्या जल देवतेचे पूजन या रुपात ही आरती होत असल्याचे सांगितले. सचिव मुकुंद खोचे यांनी गोदाआरतीच्या दीड वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला. इतिहास संकलन समितीमार्फत प्रस्ताव समोर ठेवणे, तिर्थांची निश्चिती, विद्यार्थी व जनसामान्यांपर्यंत हा विचार पोहोचवणे हा सर्व प्रवास त्यांनी गोदारतीप्रसंगी उलगडला.

रामतीर्थ गोदावरी समिती आमने सामने
अनेक वादविवाद नंतर रविवारी पुरोहित संघाच्या वतीने गोदावरी आरतीस सुरुवात करण्यात आली. तर रामतीर्थ गोदावरी समितीकडून सोमवारी सुरुवात झाली. यावेळी दोन्ही आयोजक आमने सामने दिसून आले. तर दर सोमवारी असणारी कपालेश्वराची देखील पालखी असल्याने भाविकांचा मोठा गोंधळ बघायला मिळाला. यापूर्वी इतक्या भव्य न होणारी गोदा आरती आता दोन्ही संस्थेकडून भव्य स्वरूपात सुरू झाल्याने पुढील काळात आणखी काय बघायला मिळते याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

Back to top button