पुढारी ऑनलाईन डेस्क : मी घेतलेली पॅलेस्टाईन संदर्भातील भूमिका ही पंडित जवाहरलाल नेहरू ते अटलबिहारी वाजपेयीपर्यंतच्या विचारांशी सुसुंगत होती हेच ध्यानात येते. मोदीजींना तेच अधोरेखित केले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. राजापेक्षा निष्ठावंत अधिक, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी गुरुवारी चर्चा केली आणि पॅलेस्टाईनला मानवतावादी मदत सुरू ठेवण्याचे आश्वासनही दिले. हमासने जेव्हा इस्रायलवर रॉकेट डागले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचा निषेध करत इस्रायलला पाठिंबा दिला होता. पुढील काही दिवसांत भारताने पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात व्यवहार्य तोडगा काढण्याची भूमिकाही जाहीर केली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. यावरून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
आता शरद पवार यांनी एक्सवर या नेत्यांना लक्ष केले. ते म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानापूर्वी नेहरू ते वाजपेयीपर्यंत पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत विचार व्यक्त केले. दीर्घकालीन वादावर तोडगा निघून शांतता आणि सौहार्द प्रस्थापित व्हावे हेच यातून सांगायचे होते. राजापेक्षा निष्ठावंत अधिक अशी इंग्रजी म्हण प्रचलित आहे. भाजप नेत्यांच्या टिप्पण्या त्याच धांदलीचा एक भाग आहेत."
हेही वाचा