काळजी वाढली ! गेल्या वर्षापेक्षा राज्यात 20 टक्के पाणीसाठा कमी | पुढारी

काळजी वाढली ! गेल्या वर्षापेक्षा राज्यात 20 टक्के पाणीसाठा कमी

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  दरवर्षीपेक्षा यंदा पावसाचे आगमन राज्यभर उशिरा झाले असले, तरी काही ठिकाणी तो धो-धो तर काही ठिकाणी नावापुरताच बरसला आहे. नेहमीच पश्चिम महाराष्ट्रावर कृपा ठेवणार्‍या वरुणराजाने काही अंशी वक्रद़ृष्टी केली आहे. या उलट दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यावर अवकृपाच केली असल्याचे दिसते. राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्के धरणे रिती आहेत, तर नाशिक ते नांदेडपर्यंत असलेल्या सर्व धरणांत अत्यल्प पाणीसाठा झाला असल्याचे नोंदी वरून दिसते.

राज्यात उजनी, कोयना आणि जायकवाडी ही तीन मोठी धरणे असून, पावसाळा संपत आला, तरी ती न भरल्याने दुष्काळाचे सावट राज्यावर घोंगावत असल्याचे दिसते. या शिवाय नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे आणि कोकण या विभागांत धरणांचे मोठे जाळे आहे. ही धरणे भरली तर आसपासच्या जिल्ह्यांसह गावांना व उद्योगांना पाणी दिले जाते. मात्र, यंदा धरणेच कोरडी असल्याने पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न आताच उभा राहिला आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत20 टक्के पाणीसाठा कमी आहे.

त्यामध्ये नागपूर विभाग 5 टक्के, अमरावती विभागात 17 टक्के, औरंगाबाद 43 टक्के, नाशिक 19 टक्के, पुणे 20 टक्के कमी पाणीसाठा झालेला आहे. तर कोकण विभागात एक टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा धरणात झालेला आहे. राज्यातील धरणांची पाण्याची क्षमता चिंता वाढविणारी आहे. कारण मागील वर्षी याच महिन्यात 83.34 टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र तोच पाणीसाठा 63.48 टक्के असल्याने उद्योग, शेती, या क्षेत्रांतील पाणी पुरवठ्यावर कपात केली जाऊ शकते, असे चित्र आहे.

शेतीला वरदान असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने यंदा दुष्काळी संकट वाढविणारे चित्र निर्माण केले आहे. कारण नाशिक जिल्ह्यात उगम पावणारी गोदावरी नदीचे पाणी सोडल्यानंतर ते थेट जायकवाडीत येते. सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगरसह माजलगाव, परभणी, नांदेड, व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची तहान भागवते. यंदा मात्र, नाशिक विभागातील धरणे न भरल्याने तेथून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे जायकवाडीसह पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील मुळा व निळवंडे धरण देखील दुष्काळाच्या छायेत आलेली आहेत; तर पश्चिम महाराष्ट्रातील उजनी धरणातील पाणीसाठा सरासरीपेक्षा अतिशय खाली गेला आहे.

हेही वाचा : 

हवामान बदलाने वाढवला शेतकरी आत्महत्यांचा धोका

World Athletics Championships 2023 : नीरज चोप्राने इतिहास घडविला! जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्‍ये सुवर्णपदकावर मोहर

Back to top button