आधी शिंदे म्हणाले 80, नंतर अजितदादा म्हणाले 90; पण देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मात्र सर्व गणितच फिस्कटतंय… | पुढारी

आधी शिंदे म्हणाले 80, नंतर अजितदादा म्हणाले 90; पण देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मात्र सर्व गणितच फिस्कटतंय…

पुढारी ऑनलाईन: एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा अंदाज व्यक्त होत असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे आमदारांसोबत संवाद साधताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 80 ते 85 जागा लढविण्याचा निर्धार केला होता. वर्षभरानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये अजित पवार सामील झाले. त्यांनीही कार्यकर्त्याना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 90 जागांवर लढणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने 2024 ला विधानसभेच्या 152 जागा जिंकणार असल्याचे जाहीर केल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

मुंबईमध्ये भिवंडी येथे भाजपच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्व पदाधिकारी, केंद्रीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित आहेत. या बैठकीला मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय 2024 चा संकल्प जाहीर करत विधानसभेच्या 152 जागा जिंकणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बावनकुळे यांच्या मनातील आकडा जिंकण्यासाठी तेवढ्या जागा आपल्याला मिळतील असे सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री यांच्या भाषणानंतर शिंदे गट आणि अजित पवार यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत आमदारांचे संख्याबळ 288 इतके आहे. त्यातील भाजपने किमान 152 जागा लढविण्याचे ठरले तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला फक्त 68 जागा येत आहेत.

सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना प्राप्त परिस्थिती आपला पक्ष वाढविणे महत्वाचे आहेत. त्यामुळेच पवार आणि शिंदे यांनी अनुक्रमे विधानसभेच्या 80 आणि 90 जागा लढविण्याची घोषणा आधीच केली आहे.त्याप्रमाणे या दोन्ही नेत्यांनी 80 आणि 90 जागा लढविल्यास भाजपला केवळ 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या या सर्व शक्यता आहेत. भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे किती जागा लढवणार याचे खरे चित्र निवडणुकीच्या वेळेस स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा:

महागाईमुळे आता हेच बघायचं राहीलं होतं! भाजीत न विचारता टाकले दोन टोमॅटो, पती-पत्नीमध्ये जोरदार खडाजंगी

Eknath Khadse : सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे

Maharashtra Political Crisis : महायुतीची १२ जणांची समन्वय समिती स्थापन; बावनकुळे यांची घोषणा

 

Back to top button