तंत्रशिक्षण संस्थांनी माहिती अद्ययावत करावी ; तंत्रशिक्षण संचालनालयाचा आदेश | पुढारी

तंत्रशिक्षण संस्थांनी माहिती अद्ययावत करावी ; तंत्रशिक्षण संचालनालयाचा आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमांची मान्यता आणि प्रवेशक्षमतेची माहिती अद्ययावत करून तंत्रशिक्षण संचालनालयाला कळवावी, असे स्पष्ट निर्देश प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी संचालनालयामार्फत प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी व सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी या विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाकरिता ऑनलाइन केंद्रित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता सहभागी संस्थांची अभ्यासक्रम व प्रवेशक्षमतेबाबतची माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.

तंत्रशिक्षण संस्थांना पदविका अभ्यासक्रमांसाठी संबंधित शिखर परिषदेची मान्यता, शासन मान्यता, त्यानुसार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई संलग्नता/समकक्षता प्रदान केल्याची माहिती अद्ययावत करून दि. 27 जूनला सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाइन पध्दतीने सादर करावी लागणार आहे. संबंधित माहिती अचूक असण्याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. संस्थांना dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करीन देण्यात आली आहे. मंजूर प्रवेशक्षमतेची माहिती ही प्रवेश प्रक्रियेदरम्यान जागा वाटपात दाखविण्यात येणार असल्याने माहितीत चूक झाल्यास संबंधित संस्थेचे प्राचार्य जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : 

Youtube Monetization : लवकरच ५०० सबस्क्रायबर्स असलेले युट्यूबरही कमाई करणार; जाणून घ्या युट्यूबचे नवे नियम

नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

Back to top button