संजय शिरसाटांना मिळालेल्या क्लीनचिटवर सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया... | पुढारी

संजय शिरसाटांना मिळालेल्या क्लीनचिटवर सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया...

पुणे : शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आहेत. “मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढलंय. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत”, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, आमदाराच्या प्रकरणात पोलिसांनी क्लीन चिट कशी दिली? एसआयटी चौकशी होत असताना त्याचे काय झाले. त्याचे अधिकारी कोण, याची मला माहिती नाही. कळवले नाही. चौकशी एकतर्फी झाली का?, माझी बाजू ऐकून घेण्यात आली नाही. बाजू मांडायची संधी दिली नाही. गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे. महिला आयोगाकडे हे पत्र देण्यात आले नाही. आयोगाकडे अहवाल जाण्याआधी तो सार्वजनिक कसा होतो. विशेष म्हणजे आरोपीच्या हातात हा अहवाल कसा? अहवाल फोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर गृहमंत्री निलंबनाची कारवाई करणार का ? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला आहे.

मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार, असं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं. गेली 8- 10 दिवस मी ब्रेक घेतला होता. त्यामुळं या दिवसात काय घडलं ते माहिती नाही. कोर्ट आम्हाला न्याय देईल. कोर्टाची अद्याप तारीख पडलेली नाही. कोर्ट बंद आहे. केस अद्याप बोर्डावर आलेली नाही, असं यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

Back to top button