कुरुलकर होता सतत पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या संपर्कात ! एटीएस व स्टँडिंग कमिटीच्या अहवालाचा निष्कर्ष…

कुरुलकर होता सतत पाकिस्तानी इंटेलिजन्सच्या संपर्कात ! एटीएस व स्टँडिंग कमिटीच्या अहवालाचा निष्कर्ष…
Published on
Updated on

दिनेश गुप्ता

पुणे : डीआरडीओचा संचालक प्रदीप मोरेश्वर कुरुलकर हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या सतत संपर्कात असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणेच्या हाती आले असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल एटीएस महासंचालकांना पाठवण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर आलेला अहवाल कुरुलकरच्या विरोधात असल्याचे उघड झाल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात वाढला आहे. या अहवालानुसार कुरुलकरवर लवकरच देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम वाढवले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'डीआरडीओ'चा संचालक प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यास पाकिस्तानी हेर ललनांनी घेरले होते. सामान्य माणसाला अचानक एखाद्या तरुणीचा कॉल यावा अन् तिने गोड गोड बोलून जाळ्यात अलगद घ्यावे, असेच काही त्याच्या बाबतीत घडले अन् संरक्षण विभागाची गुप्त माहिती त्याने पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) हवाली केली.

इलेक्ट्रॉनिक डिवाइस अन् कुरुलकर

कुरुलकर वापरत असलेल्या वनप्लस व ॲपल मोबाईल, ॲपल लॅपटॉप व हार्डडिस्क हे इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या डिवाइसच्या मदतीने परदेशातील शत्रू राष्ट्रांची अनधिकृतरीत्या संवाद साधत असल्याचे निष्पन्न झाले होते. संरक्षण विभागाच्या विभागाने केलेल्या तपासणीनुसार कुरुलकर हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या संपर्कात होता असे सिद्ध झाले होते.

डीआरडीओ महासंचालकांची नियुक्ती

एटीएसने गुन्हा दाखल केल्यानंतर संरक्षण विभागाच्या नियमानुसार जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइस तपासणीसाठी स्टँडिंग कमिटीकडे प्रकरण सोपवण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी डीआरडीओचे महासंचालक डॉ. एस.व्ही. गाडे यांना नियुक्त करण्यात आले होते. याच दरम्यान एटीएसनेही त्याच दिवशी फॉरेन्सिक चाचणी करून अहवाल मागवला होता. दोन्ही विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार त्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसच्या माध्यमातून त्याने पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) ला शासकीय गुपिते व इतर सर्व माहिती प्रदान केल्याचे निष्पन्न झाले.

मेसेज, व्हॉइस मेसेज व व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली

दोन्ही विभागाच्या चौकशी अहवालामध्ये जप्त इलेक्ट्रॉनिक डिवाइसच्या माध्यमातून कुरुलकरने अत्यंत संवेदनशील अशी माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्याचे उघड झाले. ही माहिती देताना त्याने व्हाट्सअप मेसेज, व्हाईस मेसेज व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सर्व गोपनीय माहिती पाकिस्तानच्या पीआयओला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एटीएस महासंचालकांना पाठवला अहवाल

कुरुलकरच्या कृत्यांचे दररोज नवनवीन प्रताप समोर येत असताना त्याने केलेल्या कृत्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणाने दोन्ही अहवालाचा आधार घेऊन तो पाकिस्तानच्या सतत संपर्कात होता असा अंतिम अहवाल सादर केला असल्याचे समजते. याबाबतचे सबळ पुरावे तपासणीच्या हाती लागले असून, आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या निष्कर्षप्रत एटीएस आली असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news