खुशखबर! मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल | पुढारी

खुशखबर! मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून 3 दिवस आधीच अंदमानसह बंगालच्या उपसागरात 19 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास दाखल झाला. मात्र, तो केरळात 4 जून रोजीच येणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

मागील वर्षी मान्सूनचे अंदामानात आगमन 22 मे रोजी झाले होते. मात्र, तो यंदा 20 मे पर्यंत येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून 19 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास दाखल झाला. तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी ही सुखद वार्ता दिली. मान्सून अंदमान सागरासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे. यापुढे तो बंगालच्या उपसागरासह अंदामान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले.

केरळात मात्र 4 जून रोजीच येणार..

गेल्या वर्षी मान्सून 22 मे रोजीे अंदमानात आला होता. यंदा तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे केरळात तो लवकर येईल असा अंदाज आहे. या बाबत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के.एस.होसाळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, मान्सूनच्या वाऱ्याची दिशा व गती यावर त्याच्या पुढच्या प्रवासाचे अंदाज दिले जातात. तो अंदमानात लवकर आला म्हणजे केरळात लवकर येईल, असा अंदाज बांधता येत नाही. तो केरळात 4 जून रोजीच दाखल होईल असा आमचा अंदाज आहे.

Back to top button