

पुणे, पुढारी ऑनलाईन: भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी राज्यातील अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीला संबोधित करताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा आधार घेत उद्धव ठाकरेेंना चांगेलच फैलावर घेतले. ते म्हणाले की, आत्ता एक पुस्तक आलं आहे. त्याचे नाव आहे 'लोक माझे सांगाती'. त्यातील पान क्रमांक 18 व 319 वरची 10 वाक्य मी तुम्हाला सांगतोय. यामधील पहिलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंसोबत नव्हती. दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची माहिती नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती. तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाचा आम्हाला आली नव्हती. चार, त्यांचे कुठे काय घडतंय याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायली हवी होती. त्यानुसार काय पाऊले उचलायची हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य असायला हवं. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, असा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
वरील वाक्य मी म्हटलेली नाहीत. हे आम्ही ज्यावेळेला बोलत होतो तेव्हा ते आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवत होते. शरद पवारांनी हे लिहिल्याने मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवशक्यता नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे या दोघांनाही टोला लगावला.
पुढे शरद पवार यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष ठराव करेल, माझं राजीनामा माझ्याकडे परत येईल. शरद पवार यांनी राजीनामा देतो म्हणणं आणि देणं यातला फरक उद्धव ठाकरे यांना समजून सांगितला, असे ते म्हणाले.