खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, म्हणाल्या बैलगाडा शर्यत…. | पुढारी

खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, म्हणाल्या बैलगाडा शर्यत....

पुणे, पुढारी ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज तामिळनाडूतील पारंपरिक खेळ जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. तामिळनाडूतील जल्लीकट्टू, कर्नाटकातील कंबाला आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणारे कायदे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (तामिळनाडू सुधारणा) कायदा, २०१७ हा पारंपरिक खेळांदरम्यान प्राण्यांना होणारा त्रास कमी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच ‘जल्लीकट्टू’ हा तामिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत जल्लीकट्टू आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या कायद्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर बैलगाडा शर्यतीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे त्यांनी आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होणार आहे, असं देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Back to top button