किरण जोशी
पिंपरी : एकाच व्यक्तीने एकाच छायाचित्राच्या आधारे तब्बल 590 बोगस सीमकार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती टेलिकॉम विभागाच्या पाहणीत पुढे आली आहे. राज्यातील 12 कोटींपैकी जवळपास 5 लाख अर्जांची तपासणी केली असता, तब्बल 21 हजारांवर बोगस सीमकार्ड सापडली असून, ती बंद करण्यात आली आहेत. या कार्डचा गुन्ह्यांमध्ये वापर झाल्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित जिल्ह्यांतील पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे.
दिल्लीत बनावट सीमकार्डाव्दारे आर्थिक फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मोबाईल सेवेवर नियंत्रण ठेवणार्या टेलिकॉम विभागाने महाराष्ट्रातील बनावट सीमकार्ड शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोबाईल कंपन्यांकडून कॅफ (कस्टमर अॅप्लिकेशन फॉर्म) मागविण्यात आले. सिडॅकच्या सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून आर्टिफिशिअल इंटलिजन्स टूल वापरून प्राथमिक टप्यात 5 लाखांवर कॅफ तपासण्यात आले. यामध्ये राज्यातील 21 हजार 31 बोगस सीमकार्ड असल्याची माहिती पुढे आली. ही सीमकार्ड ताबडतोब बंद करण्यात आली असून, टेलिकॉम विभागाने संबंधित जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
मोबाईल कंपन्यांकडून पीओएस (पॉईंट ऑफ सेल) यांना सीमकार्ड विक्रीसाठी दिली जातात. सध्या टपर्यांवरही हे पीओएस सीमकार्डची विक्री करीत आहेत. ई केवायसी आणि डी केवायसी या माध्यमातून फॉर्म भरून सीमकार्ड दिले जाते. या मोबदल्यात पीओएसला सुमारे 50 रुपयांचे कमिशन मिळते. ई केवायसीमध्ये ग्राहकाच्या अंगठ्याव्दारे ओळख सिद्ध होत असल्याने या प्रकारात फसवणूक झाल्याचे पुढे आलेले नाही. मात्र, डी केवायसीमध्ये केवळ लाईव्ह फोटो व आधारकार्डची झेरॉक्स प्रत घेऊन सीमकार्ड दिले जाते. या पद्धतीतील त्रुटीचा फायदा घेऊन बनावट सीमकार्ड घेण्यात आले आहेत. इंटरनेट व इतर डाटाबेसच्या माध्यमातून आधारकार्ड मिळवून त्यावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र चिकटविले जाते. या आधारकार्डचा वापर करून सीमकार्ड मिळवले जात आहे.
इंडियन टेलिग्राफ अॅक्टअंतर्गत नियमानुसार एका व्यक्तीला 9 सीमकार्ड वापरण्याची परवानगी आहे. कंपन्यांना बल्क सीमकार्डसाठी वेगळा नियम आहे. पुण्यात एकाच व्यक्तीचे छायाचित्र इतरांच्या आधारकार्डवर चिटकवून सुमारे 590 बोगस सीमकार्ड घेतल्याचे दिसून आले आहे. याच प्रकारे अन्य शहरांतही एकाच व्यक्तीच्या छायाचित्रावर 100 ते 300 सीमकार्ड आढळून आली आहेत.
अशा बोगस पद्धतीने घेतलेल्या सीमकार्डचा वापर गुन्हेगारांकडून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच परराज्यातून येणार्या नागरिकांकडून जास्त पैसे उकळून सीमकार्डचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे टेलिकॉम विभागाकडून ही सर्व बोगस सीमकार्ड तातडीने बंद करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, ठाणे, अहमदनगर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, बीड
बोगस सीमकार्डबाबत अॅलर्ट मिळाल्यानंतर टेलिकॉम विभागाने मोबाईल कंपन्यांकडून सुमारे 5 लाख फॉर्म तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. सिडॅकमध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्स टूलच्या माध्यमातून तपासणी केल्यावर एकाच छायाचित्रांव्दारे अनेक सीमकार्ड घेतल्याचे निदर्शनास आले. राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस सीमकार्ड आढळून आल्याने ही कार्यवाही अधिक गतीने करणार आहोत.
– विनय जांभळी,
संचालक, टेलिकॉम विभाग, महाराष्ट्र