'त्या' 32 गावांचा लोकप्रतिनिधींना विसर! | पुढारी

'त्या' 32 गावांचा लोकप्रतिनिधींना विसर!

कोल्हार खुर्द : पुढारी वृत्तसेवा : सर्वत्र अवकाळी पावसाने हाहाऽऽ कार केला आहे. शेतकरी व सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. शेतकरी जणू जुगार खेळल्याप्रमाणे भांडवल पिकांमध्ये गुंतवून बसले, मात्र अवकाळीने तडाखा दिल्याने तो उध्वस्त झाला. या शेतकर्‍यांना वाली मात्र कुणीच उरला नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधींना या शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे वास्तव दिसते. राहुरीच्या 32 गावांना तोडून श्रीरामपूर मतदार संघास जोडले. तेव्हापासून या गावांना दुर्दशेला सामोरे जावे लागत आहे.

या गावांना आमदार भेट देऊन जनतेच्या अडचणी जाणून घेतील, अशी भाबडी आशा गावातील जनता धरते, मात्र काही अपवाद सोडल्यास तीन वर्षांपासून या मतदार संघात येथील काही गावांना आमदार आल्याचे मात्र स्मरण करून द्यावे लागते. यदाकदाचित आमदार यातील एखाद्या गावात आल्यास ठराविक एखाद्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरी भेटून अदृश्य होतात. त्यामुळे येथील मतदार जनतेला आमदार कोण? हेही विस्मृतीत जाऊ लागले आहे. ‘आमदार आमच्या गावी केव्हा येणार?’ अशी साद येथील मतदार जनता घालत आहे.

शेतकरी अडचणीत असताना लोकप्रतिनिधीच जर शेतकर्‍यांना दिलासा देण्यास येत नसतील तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही, असे हतबल झालेले शेतकरी म्हणत आहेत. आमदारांप्रमाणेच खासदारांना सुद्धा मतदार जनतेला भेटण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. खासदारसुद्धा वर्तमानपत्रात एखादे स्टेटमेंट देण्यापुरते भेटीला येतात. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने समस्या मांडायच्या कुणापुढे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जनतेसह चोहोबाजूंनी होरपळलेल्या शेतकर्‍यांना वाली कोण? असा प्रश्न पडल्याचे वास्तव चित्र दिसत असून बळीराजा हतबल व निराश झाला आहे.

Back to top button